कोरोनामुळे साताऱ्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी घातला गोंधळ
By नितीन काळेल | Published: November 4, 2022 01:40 PM2022-11-04T13:40:45+5:302022-11-04T14:36:50+5:30
नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, सातारा शहरातील एक २१ वर्षांची गर्भवती महिला ३१ ऑक्टोबर रोजी दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी महिलेला थंडी आणि ताप अशी लक्षणे होती. त्यातच महिला गर्भवती आणि पोटात दोन बाळे असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. असे असतानाच महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. दरम्यान, काल, गुरुवारी सायंकाळपासून महिलेला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास संबंधित महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, आज, शुक्रवारी सकाळी मृत महिलेचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात आले आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले. त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा तसेच शेवटच्या क्षणी रुग्णाला अधिक उपचारासाठी पुण्याला नेण्यास सांगितले असा आरोप केला. या गोंधळामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. यादरम्यान, जिल्हा शलचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दालनात डॉक्टर आणि नातेवाईकांना बोलवून चर्चा घडवून आणली. त्यानंतर नातेवाईकांना खरी परिस्थिती सांगितली.
संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याने त्याप्रकारे उपचार करण्यात आले. पण, गुरुवारी सायंकाळनंतर महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांना परिस्थिती समजावून सांगितली. डॉक्टरांचा कोठेही हलगर्जीपणा झालेला नाही. - डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक