मृत्यू गाठतोय ‘खिंडी’त !
By admin | Published: September 25, 2015 10:38 PM2015-09-25T22:38:32+5:302015-09-26T00:40:01+5:30
सातारा : शिवराज तिकाटणं ठरतंय धोक्याचं; आठ वर्षात ३४ जणांचा बळी
सातारा: येथील शिवराज तिकाटण्यावर अपघाताची मालिका संपता संपेनाशी झाली आहे. या ठिकाणी ओव्हर ब्रीज नसल्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असून गेल्या आठ वर्षात या ‘खिंडी’त तब्बल ३४ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या ठिकाणी होणारा प्रस्तावित ओव्हर ब्रीज होईपर्यंत आणखी कितीजणांचा बळी जाणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.महामार्ग प्राधिकरणाने ज्यावेळी हायवेचे काम हाती घेतले. त्यावेळी शिवराज पेट्रोलपंपाजवळ उड्डाण पूल उभारण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. सध्या महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू आहे. शिवराज तिकाटण्यावर उड्डाणपूल उभारण्याचे महामार्ग प्राधिकरणाने नियोजन केले आहे. मात्र, तोपर्यंत हा चौक कितीजणांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवारी रात्री सातारा शहरातील जितेंद्र बहुलेकर या दुचाकीस्वाराला त्याच ठिकाणी ट्रकने उडविले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज तिकाटण्यावर सातत्याने अपघात होत असल्याने गेल्या आठ वर्षांत या ठिकाणी किती जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. याची माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली.गेल्या आठ वर्षांत या तिकाटण्यावर तब्बल ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस डायरीत नोंद आहे. इतकी भयानक परिस्थिती असताना यावर कोणीच काही बोलत नाही. त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वारांना नाहक जीव गमवावा लागत आहे.
शिवराज तिकाटण्यावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. हे ठिकाण अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखत असताना महामार्ग प्राधिकरणाने कसलेही सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांची अनेकदा फसगत होत आहे. खिंडवाडीहून साताऱ्यात येत असताना उतार आहे. त्यामुळे वाहने वेगात येत असतात. याचवेळी एखादा पादचारी किंवा दुचाकीस्वार महामार्ग ओलांडत असेल तर त्याचा जीव कासावीस होतो. (प्रतिनिधी)
‘त्या’ कुटुंबाला अजूनही धास्ती !
दोन वर्षांपूर्वी सत्त्वशीलनगर परिसरात राहणाऱ्या माणिक शिंदे कुटुंबीयाचा एकुलता एक मुलगा याच शिवराज तिकाटण्यावर ठार झाला. त्यानंतर काही महिन्यातच त्याच ठिकाणी त्याच्या मावशीचाही असाच दुर्देवी अंत झाला. सध्या या ठिकाणाहून जाताना शिंदे कुटुंबीय नेहमी धास्तावलेले असते. घरातील दोन व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महामार्ग ओलांडून न जाता देगाव फाट्यावरून भुयारी पुलाखालून घरी जाण्याचा शक्यतो शिंदे कुटुंबीय प्रयत्न करत असते. इतकी दहशत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.