सातारा-लोणंद रस्त्यावर आता मरण झालंय स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:56+5:302021-02-24T04:40:56+5:30
वाठार स्टेशन : सर्वाधिक अवजड तसेच प्रवासी वाहतूक रस्ता अशी नोंद असलेला सातारा-वाठार-लोणंद हा राष्ट्रीय मार्ग खड्ड्यांमुळे जीवघेणा ...
वाठार स्टेशन : सर्वाधिक अवजड तसेच प्रवासी वाहतूक रस्ता अशी नोंद असलेला सातारा-वाठार-लोणंद हा राष्ट्रीय मार्ग खड्ड्यांमुळे जीवघेणा ठरत होता. मात्र या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाल्याने या मार्गावरून वाहने सुसाट धावू लागली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना अपघाताचे प्रमाण वाढले असून, या रस्त्यावरून प्रवास करताना मरण स्वस्त झाल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
या रस्त्यावरील तडवळे फाटा ते वाढे फाटा या २४ किलोमीटर रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हा रस्ता मजबूत झाल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. शिवाय वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावर वाहने सुसाट धावत असून, दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम जरी झाले असले तरी दोन मोठी वाहने बसतील एवढाच रस्ता असल्याने वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिवाय या रस्त्याच्या दुतर्फा अनेक गावे वसली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ सकाळी व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी रस्त्यावर येत असतात. शाळकरी मुलांचीही याच ठिकाणाहून रेलचेल सुरू असते. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाल्याची नोंद आहे.
चांगला रस्ता जरी झाला असला तरी बसस्थानक शाळा, हॉस्पिटल अशा गर्दीच्या ठिकाणी तरी किमान रस्ते सुरक्षा विभाग जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने सुरक्षा फलक, सिग्नल यंत्रणा तसेच गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे.
फोटो : २४ संजय कदम
सातारा-लोणंद रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. या मार्गावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगावर मर्यादा राहिली नाही. (छाया : संजय कदम)