मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामात हजारो झाडांचे डेथ वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:40 PM2018-11-13T22:40:12+5:302018-11-13T22:40:19+5:30
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गाचे पहिल्या टप्प्यातील महूद ते मायणी या सुमारे ६० किलोमीटरच्या राज्यमार्गाच्या ...
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गाचे पहिल्या टप्प्यातील महूद ते मायणी या सुमारे ६० किलोमीटरच्या राज्यमार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, यामुळे मार्गालगत असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल होणार आहे.
गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे रखडत असलेला मल्हारपेठ-पंढरपूर हा शिवकालीन राज्यमार्ग कधी चौपदरीकरण होणार, याची प्रतीक्षा वाहनचालक या मार्गालगत राहत असलेल्या ग्रामस्थांना लागली होती, ही प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.
मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरामधील मायणी, ता. खटाव ते महूद, ता. सांगोलादरम्यानच्या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम महूद येथून सहरू झाले आहे. संबंधित ठेकेदारांकडून या मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या अंतराची मोजणी पूर्ण करून तशा प्रकारच्या खुणाही राज्यमार्गावर केल्या आहेत.
या कामादरम्यान महूद ते मायणी या अंतरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेल्या झाडांवर नंबर लिहून झाडांची गणना नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे या कामादरम्यान किती झाडांची कत्तल होणार, हे निश्चित झाले आहे. हा आकडा हजाराच्या घरात केला आहे.
मल्हारपेठ ते पंढरपूर हा राज्यमार्ग दुष्काळी पट्ट्यातून जात आहे. या भागात झाडांचे प्रमाण ही अल्प आहे. असणारी झाडे ही वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना व ऊन, वारा सहन करून उभी राहिलेली आहे. त्यामुळे शासनाने संबंधितांकडून या मार्गावर नव्याने वृक्षारोपण आतापासून करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून मार्गाचे काम पूर्ण होताच मार्गावरील वृक्षही बहरलेले दिसतील.
मायणीच्या बाजारपेठेवर संक्रांत
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर सुमारे एक किलोमीटर मायणीची मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून गत आठवड्यामध्ये रस्त्याचा मध्यभागापासून दोन्ही बाजूंस सुमारे १७ फुटांची मोजणी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंस असणाºया बाजारपेठेतील अनेक दुकान गाळ्यांना झळ पोहोचणार असल्यामुळे बाजारपेठवर काही काळासाठी संक्रांत येणार आहे.
मार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर सुमारे एक किलोमीटर मायणीची बाजारपेठ आहे. ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच बरोबर मसूर, ता. कºहाड, शेनवडी, ता. माण व उंब्रजमधूनही हा राज्यमार्ग जात असल्यामुळे या गावातील बाजारपेठेला कमी-अधिक फटका बसणार आहे.