साडेतीन हजार रिक्षांचं ‘डेथ वॉरंट’ !: परमिट रिक्षा जाणार भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:04 AM2019-01-09T00:04:57+5:302019-01-09T00:09:13+5:30
संजय पाटील । कºहाड : प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोळा वर्षांपूर्वीच्या तब्बल साडेतीन हजार अॅटो आणि वडाप रिक्षा आता ...
संजय पाटील ।
कºहाड : प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोळा वर्षांपूर्वीच्या तब्बल साडेतीन हजार अॅटो आणि वडाप रिक्षा आता भंगारात जाणार आहेत. संबंधित रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रोखण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानेही त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित रिक्षा आता रस्त्यावर आणताच येणार नाहीत. रिक्षाबरोबरच जिल्ह्यातील ४७ टॅक्सींनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांचे आयुर्मान ठरविण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत. तसेच कंत्राटी परवान्यावरील वाहने ही प्रवाशांना आरामदायी सेवा देणारी असावीत, अशी तरतूदही या कायद्यामध्ये आहे. मात्र, अनेकवेळा खिळखिळ्या झालेल्या वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तसेच प्रवाशांनाही योग्य सेवा मिळत नाही. परिणामी, राज्य परिवहन प्राधिकरणाने २९ एप्रिल २०१३ रोजी बैठक घेऊन त्यामध्ये सोळा वर्षांपूर्वीच्या परमिट रिक्षा आणि वीस वर्षांपूर्वीच्या परमिट टॅक्सी परवान्यावरून उतरवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातच त्यावेळी हा नियम लागू करण्यात आला. त्यानुसार कार्यवाही झाली आणि हजारो रिक्षा, टॅक्सी रस्त्यावरून बाजूला गेल्या.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी मुंबईसाठी घेण्यात आलेला हा निर्णय राज्यभर लागू करण्याबाबतच्या सूचना १९ डिसेंबर २०१८ रोजी परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन कार्यालयांना दिल्या. त्यानुसार पत्रव्यवहारही झाला. सातारा जिल्ह्यात सातारा आणि कºहाड या दोन्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना याबाबतचे पत्र त्याचदिवशी मिळाले. परिवहन आयुक्तांच्या या सूचनेनंतर सातारा आणि कºहाड या दोन्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परमिटच्या अॅटोरिक्षा, वडाप रिक्षा आणि जीपची पुनर्नोंदणी थांबविण्यात आली. तसेच जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची परिचलन पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूळ नोंदणीच्या दिनांकापासून मीटर टॅक्सी २० वर्षांनंतर व अॅटो आणि वडाप रिक्षा सोळा वर्षांनंतर परवान्यावरून उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मूळ नोंदणीच्या दिनांकापासून सोळा वर्षे पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र आरटीओकडून नूतनीकरण करून दिले जाणार नाही. परिणामी, संबंधित मालकाला त्याची रिक्षा रस्त्यावर आणता येणार नाही.
परमिट वाहनाची दरवर्षी तपासणी
प्रवासी वाहतूक परवाना असलेल्या अॅटो रिक्षा, वडाप रिक्षा तसेच इतर सर्व वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी दरवर्षी केली जाते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वत:ही तपासणी करतात. यांत्रिकी आणि बांधणीमध्ये वाहन सुस्थितीत असेल तरच संबंधित वाहनाला पुढील एक वर्षासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. आजपर्यंत वर्षानुवर्षे वडापवाले आपल्या वाहनाचे अशाच पद्धतीने ‘परमिट रिन्युअल’ करून घेत आलेत. मात्र, आता संबंधित वाहनालाच कालमर्यादा ठरविण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण
१) श्वेता सिंघल - अध्यक्षा
जिल्हाधिकारी, सातारा
२) पंकज देशमुख - सदस्य
पोलीस अधीक्षक, सातारा
३) संजय धायगुडे - सदस्य सचिव
परिवहन अधिकारी, सातारा
४) अजित शिंदे - सदस्य
परिवहन अधिकारी, कºहाड
निर्णय कशासाठी..?
१ प्रवासी वाहतूक वाहनाची कार्यक्षमता वयोमर्यादेनुसार कमी होते
२ अशी वाहने प्रवाशांसाठी आरामदायी असू शकत नाहीत
३ प्रवास करणाºया प्रवाशांना वाहनात सुरक्षित वाटत नाही
४ यांत्रिकी आणि बांधणी अकार्यक्षम झाल्याने अपघात होऊ शकतो
५ जुन्या यांत्रिकी रचनेमुळे वायू प्रदूषणास ही वाहने कारणीभूत ठरतात
५ जुन्या बांधनीमुळे वाहन चालविताना चालकावर ताण येतो
मूळ नोंदणीच्या दिनांकापासून सोळा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा, तसेच वीस वर्षे पूर्ण झालेल्या टॅक्सीच्या मालकांनी संबंधित वाहनावरील परमिट तत्काळ उतरून घ्यावे. तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द करून घ्यावी. जुनेच परमिट नवीन वाहन किंवा ठरवून दिलेल्या कालमर्यादेतील अन्य वाहनावर नोंदवून घ्यावे.
- अजित शिंदे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कºहाड