वहागावात शालेय साहित्यांची मोडतोड, अज्ञातांचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 04:16 PM2019-03-30T16:16:05+5:302019-03-30T16:19:08+5:30
कऱ्हाड : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ...
कऱ्हाड : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही समाजकंटक हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व वैयक्तिक द्वेषापोटी शालेय साहित्यांची मोडतोड करून त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजकंटकांच्या या वर्तनाविषयी ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे.
वहागाव प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगल्या पद्धतीने उंचावत चालला आहे. परिसरातील तेरा शाळांची केंद्र शाळा असलेल्या या शाळेत विद्यार्थी संख्याही चांगली आहे. येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे शाळेचा दर्जा चांगल्या पद्धतीने सुधारत आहे.
शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली धडपड पाहून गावातील युवक, ग्रामस्थांनी शाळा आयएसओ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने मदतीचा हात देण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचे रुपडे पालटत चालले आहे.
भावी पिढीचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वखर्चातून शाळेच्या रंगरंगोटीसह, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि अन्य योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी कौतुकाची थाप दिली. एकूणच आयएसओच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांसह, शिक्षिकांना त्याचा फायदा होत असल्याने दिवसेंदिवस शाळेचे रुपडे पालटत चालले होते.
शाळेची प्रगती होत असल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, काही समाजकंटकांकडून शाळेच्या साहित्याची मोडतोड करून त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही संगणकासह, दरवाजे व इतर शालेय साहित्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. गेल्या दोन वर्षांत सहा ते सातवेळा येथील साहित्य मोडतोडीचा प्रकार झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात संताप व्यक्त होत आहे. संबंधित अपप्रवृत्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.