मालगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 13, 2017 11:30 PM2017-06-13T23:30:01+5:302017-06-13T23:30:01+5:30
मालगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शिवथर : मालगाव (ता. सातारा) येथील दिलीप शामराव कदम (वय ५२) यांनी मंगळवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते.
कदम हे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामध्ये उत्पादक विभागात आॅपरेटर म्हणून काम करत होते. एक एकर शेती आणि पगारामध्ये त्यांचा घरखर्च भागत नव्हता. त्यातच त्यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींचे लग्न झाले असून तिसरी मुलगी आणि मुलगा शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. ज्या बँकांमधून त्यांनी कर्ज काढले होते, त्या बँकांना त्यांच्या पगारातून पैसे जात होते. त्यामुळे घरात आर्थिक विवंचना होती.
मंगळवारी सकाळी ते मळवी नावाच्या शिवारात गेले होते. बराचवेळ झाला तरी वडील घरी आले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. त्यावेळी कदम हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसले. या ठिकाणी त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मुलाने हा प्रकार घरी येऊन सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कदम यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला.