कोयना धरण प्रकल्पाचे ‘साठी’त पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:44+5:302021-05-17T04:37:44+5:30

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाने साठीत प्रवेश केला आहे. धरणाला रविवारी (दि. १६) ५९ वर्षे पूर्ण ...

Debut of Koyna Dam project in 'Saathi' | कोयना धरण प्रकल्पाचे ‘साठी’त पदार्पण

कोयना धरण प्रकल्पाचे ‘साठी’त पदार्पण

Next

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाने साठीत प्रवेश केला आहे. धरणाला रविवारी (दि. १६) ५९ वर्षे पूर्ण झाली. धरणाने साठव्या वर्षात पदार्पण केले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली. हजारो भूकंपांचे धक्के सहन केले. तसेच अतीवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला. मात्र, तरीही साठ वर्षांनंतरही हे धरण भक्कम असेच आहे.

१६ मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा भाग्याचा आणि आनंदाचा म्हणावा लागेल. १६ मे १९६२ रोजी आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनाची शक्ती असणाऱ्या कोयना धरणाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कोयना प्रकल्प हा स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा अध्याय आहे. विज्ञानाचे आणि विकासाचे मंदिर म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. आशिया खंडातील हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, याच्या उभारणीत पाटण तालुक्यातील भूमिपुत्रांची महत्त्वाची भूमिका आहे.

महाबळेश्वरपासून ६४ किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण आहे. धरणातील पाणीसाठ्यावर वीजनिर्मिती करून पूर्वेकडील शेती हिरवीगार करण्याबरोबरच दुष्काळ निवारणाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येते. धरणातील पाण्याचा वापर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसाठीही होतो. धरणापासून मिळणारी वीज महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू करणारी आहे. या परिसरात जवळपास २०० इंच पाऊस पडणारे मोठे पाणलोट क्षेत्र आहे. धरणातील तब्बल ६७.५ टीएमसी पाणीसाठा वीज निर्मितीला वापरला जातो. त्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान झाला आहे. तसेच महाराष्ट्रासह जवळच्या राज्यांना शेती, उद्योगाकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याची मूलभूत गरज भागविण्याचे कामही धरणाच्या माध्यमातून गेली साठ वर्षे अविरत सुरू आहे.

- चौकट

भूमिपुत्रांचा अद्यापही न्यायासाठी लढा

कोयना धरणामुळे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला; पण ज्यांनी या धरणाच्या निर्मितीत योगदान दिले, धरणाला जागा दिली तोच भूमिपुत्र आजही आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. साठ वर्षांपासून त्यांचा न्यायासाठी लढा सुरू असून, अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. राज्य प्रकाशमान करणाऱ्या या धरणग्रस्तांच्या आयुष्यात आजही अंधारच आहे.

- चौकट

धरणाचा लेखाजोखा

साठवण क्षमता : १०५.२५ टीएमसी

ओलिताखाली येणारे क्षेत्र : १२.२३ हजार हेक्टर

ओलिताखाली येणारी गावे : १००

सद्य:स्थितीत साठा : ३६.६६ टीएमसी

- चौकट

भूकंपातही भक्कम

११ डिसेंबर १९६७ ला झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने सह्याद्री हादरला. मात्र, ही भीषण आपत्ती कोयना धरणाने पेलली. या भूकंपाने जमिनी भेगाळल्या. सव्वाशे जणांचे जीव गेले, तर, बऱ्याच काळापर्यंत या भूकंपाची भीती सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रात व्यक्त होत राहिली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही या परिसराने व कोयना प्रकल्पाने भूकंपाचे लक्षावधी धक्के पचविले आहेत.

फोटो : १६केआरडी०२

कॅप्शन : कोयना धरण

Web Title: Debut of Koyna Dam project in 'Saathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.