Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

By नितीन काळेल | Published: April 25, 2023 11:25 AM2023-04-25T11:25:43+5:302023-04-25T11:26:09+5:30

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा

Deception of transporters by lawsuits during peak sugar factory season, Looting of farmers | Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

googlenewsNext

सातारा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगारांसाठी मुकादमांना उचल देऊनही टोळ्या न देता परस्पर पैसे लाटण्याच्या घटना दोन वर्षात वाढल्या असून, जिल्ह्यात अशी १ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. या माध्यमातून मुकादमांनी वाहतूकदारांना सुमारे ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे उसाला कोयता लावण्यासाठी टोळ्या लूट करत आहेत.

राज्याचा डोलारा कृषी आणि सहकारावर उभा आहे. साखर कारखान्यामुळे तर अनेक कुटुंबांना आधार मिळालाय. या माध्यमातून वर्षातील सहा महिने तरी अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळतोय. पण, यामध्येही आता अनिष्ट गोष्टी घडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांची लूट होत आहे. तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना फसविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा गंडा गरीब वाहनधारकांना बसलाय. सातारा जिल्ह्यात हा आकडा सतत वाढतच चालला आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत साखर कारखाने करार करून ऊसतोडणी कामगार आणत असत. यासाठी मुकादम ही व्यवस्था होतीच. यामध्ये मुकादमांना उचल देणे, ने-आणण्याची जबाबदारी कारखाना प्रशासन पाहत होते. पण, गेल्या काही वर्षांत कारखान्यांनी ही जबाबदारी ढकलली आहे. आता कारखाना प्रशासन वाहनधारकांशी करार करते. त्यासाठी कारखान्याकडून वाहनधारकांना रक्कम देण्यात येते. यातून वाहनधारकाने मुकादमाला भेटून ऊस तोडणीसाठी टोळ्यांची जबाबदारी घ्यायची. त्यासाठी टोळ्यांना पैसेही देण्यात येत आहेत.

म्हणजे वाहनधारकच पैसे देण्यापासून टोळ्या आणणे-नेण्याची जबाबदारी घेत आहेत. पण, आगाऊ उचल घेऊनही टोळ्या येत नाहीत. तसेच काहीवेळा टोळ्या आल्या तरी काही दिवस काम करतात आणि परत पळून जातात. यामुळे वाहनधारकांनाच याचा फटका बसत आहे. कारण, कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा बसतो.

सातारा जिल्ह्यात मागील दोन वर्षात टोळ्यांनी फसविल्याची सुमारे १ हजार २०० प्रकरणे घडली आहेत. या टोळ्यांनी वाहनधारकांना ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारक रस्त्यावर आले आहेत. कारखान्याशी करार करणारे वाहनधारक हे गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. कर्ज घेऊन वाहन खरेदी आणि हप्ते भरून नाकीनऊ आले असताना या टोळ्या व मुकादमांकडून गंडा घातला जात आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विडा उचलला आहे. आता शासन दरबारी यावर काही मार्ग निघणार का, हाच आता प्रश्न आहे.

दरम्यान, टोळ्या तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना गंडा घातला जातो. तसेच ऊसतोड मजूर हे उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पैसे घेतात. एक एकर ऊसतोडीसाठी ५ ते १० हजार रुपये घेतले जातात. यातून शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रकार होतो. हे दुष्टचक्र काेणीही थांबवत नाही.

टोळीची स्थिती...

  • एक टोळीत ५ ते १० जोड्या असतात. त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
  • एक टोळी हंगामासाठी ५ ते १० लाख रुपये घेते.
  • टोळीसाठी मुकादमाचा रोल महत्त्वाचा.
  • एक टोळी दिवसाला क्षमतेनुसार अर्धा ते एक एकर क्षेत्रातील ऊसतोडणी करते.
  • कारखान्याच्या क्रशिंग क्षमतेवर टोळ्या ठरतात. साधारणपणे एका कारखान्यासाठी २५० ते ३०० टोळ्या हंगामात लागतात.

Web Title: Deception of transporters by lawsuits during peak sugar factory season, Looting of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.