coronavirus : शाळा बंदचा निर्णय म्हणजे दार उघडं आणि मोरीला बोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 04:15 PM2022-01-06T16:15:59+5:302022-01-06T16:17:01+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व सुरू ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय झालाच तर तो ‘दार उघडं आणि मोरीला बोळा’ असाच असणार आहे.
सातारा : कोरोनाची लागण सुरू झाल्यापासून दोन्ही लाटांमध्ये शाळा बंद करण्याच्या पर्यायावर अधिक भर देण्यात आला. शाळेत विद्यार्थी जातात म्हणून ती बंद करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. मात्र, हेच विद्यार्थी त्यांच्या पालकांबरोबर ज्या ज्या ठिकाणी फिरतात ती ठिकाणं मात्र सुरू ठेवण्यात येतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व सुरू ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय झालाच तर तो ‘दार उघडं आणि मोरीला बोळा’ असाच असणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुण्यासह मुंबईतील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाला विरोध करण्याची संधीही प्रशासनाने त्यांना दिली नाही. महानगरांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही शाळा बंदचा आदेश येऊ शकतो, याची धास्ती शाळांनी घेतली आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडात विद्यार्थ्यांचे झालेले मानसिक आणि शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा प्रयत्नशील असताना पुन्हा शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांशी खेळ केल्यासारखं होईल. समवयस्कांबरोबर वावरण्याबरोबरच शैक्षणिक प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा शाळा बंदचा निर्णय त्यांची मोठी वाताहात करणारा ठरेल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा सुरू झाल्या. या तीन महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतून विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे ऐकिवात नाही. संकट येणार आणि त्याच्याशी सामना करण्याची सवय मुलांना लावणं आता गरजेचं आहे. त्यामुळे शाळा बंद करून संकटाला घाबरून मुलांना आणि या पिढीला भित्रे बनवणे अयोग्य आहे. - राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, खासगी शाळा संघटना
मुलांचे भावविश्व वेगळे आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही समवयस्कांबरोबर व्यक्त होण्यातला आनंद काही वेगळाच असतो. सगळं सरसकट बंद असताना मुलांना आऊटसोर्स होण्यासाठी मुलांसाठी शाळा हे उत्तम माध्यम असताना वारंवार त्यावरच बंदी आणणे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोक्याचे आहे. - अतुल शहा, शिक्षणतज्ज्ञ, सातारा
शाळेत गेल्यामुळे मुलांना त्यांच्या वयाचे सवंगडी मिळत आहेत. पण शाळांमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेण्यासाठी शालेय यंत्रणा असक्षम असल्याचे आढळून आले आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आढळून आले नाही, पण भविष्यातही येणार नाही हे गृहित धरणं चुकीचे आहे. - प्रशांत मोदी, सातारा जिल्हा पालक संघ