राष्ट्रवादीमधील गटबाजीच्या धोक्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:53 PM2019-07-31T23:53:42+5:302019-07-31T23:53:51+5:30
शेंद्रे : ‘विधानसभा निवडणुकीत गटबाजीचा धोका होईल, ही शक्यता होती. याबाबत पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगूनही त्यांनी ते समजून घेतले नाही. ...
शेंद्रे : ‘विधानसभा निवडणुकीत गटबाजीचा धोका होईल, ही शक्यता होती. याबाबत पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगूनही त्यांनी ते समजून घेतले नाही. त्यामुळे अखेर पक्ष सोडावा लागला,’ असे स्पष्टीकरण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शेंद्रे, ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भाजपवासी झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे बुधवारी रात्री जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, कांचन साळुंखे, सौरभ शिंदे, लालासाहेब पवार, राजू भोसले, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदींसह सातारा शहर, तालुका व जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘राष्ट्रवादी पक्षात पहिल्यापासूनच कूरघोड्या सुरू होत्या. त्या पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्या होत्या. अंतर्गत गटबाजीचा धोका होईल, या शक्यतेने मी हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत सातारा-जावळीतून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळवून दिले होते. तरीदेखील कूरघोड्या थांबल्या नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.’
‘उरमोडी कॅनॉलचे काम प्रलंबित आहे, मेडिकल कॉलेजचा प्रश्न, सातारा तालुक्याला साडेतीन टीएमसी पाणी खेळले पाहिजे. भाऊसाहेब महाराजांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे. सातारा हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, ही कामे पूर्ण करायची असतील तर सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. सातारा-जावळी मतदारसंघात विकास साधण्याच्या हेतूनेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या मेळाव्याला सातारा शहर, तालुका, जावळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश कदम, लालासाहेब पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.