उदयनराजेंच्या आदेशानंतरच निर्णय : साळुंखे
By admin | Published: January 26, 2016 12:56 AM2016-01-26T00:56:22+5:302016-01-26T00:56:22+5:30
जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत तळ्यात-मळ्यात
सातारा : जिल्हा परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तयार असले तरी दोन पदाधिकारी अजूनही मुदतवाढीच्या मागणीवर अडून बसले आहेत. उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी तर ‘उदयनराजेंच्या आदेशाशिवाय मी कसा निर्णय घेणार?,’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
गोरेंचे उपोषण, नाराजांचा पक्षत्याग, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे बंड अशा घटनांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काही दिवसांपासून खळबळ माजली आहे. या परिस्थितीत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, आ. शशिकांत शिंदे या नेते मंडळींनी पक्षातील ‘पॅचवर्क’बाबत कोणतेच भाष्य केले नव्हते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती; पण रविवारी राष्ट्रवादी भवनात हे दोन्ही एकत्र आले. त्यांनी सर्व आमदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत ही नेतेमंडळी ठाम आहेत. चार पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याबाबत सकारात्मकता दाखविली असली तरी उदयनराजे समर्थक असणारे रवी साळुंखे यांच्यासह जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम हे राजीनामा देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. हा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी बोलून तोडगा काढावा लागणार असल्याने त्यांच्याशी बोलणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. मात्र, उदयनराजेंशी कोणी बोलायचे? याबाबत निर्णय झालेला नाही.
आमदार शशिकांत शिंदे अथवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांपैकी एकावर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे. आ. शिंदे यांनी अमित कदम यांची समजूत घालण्यासाठी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)
अमित कदमांना उपाध्यक्षपद ?
जिल्हा परिषदेच्या मागील पदाधिकारी निवडीवेळी अमित कदम हे उपाध्यक्षपदासाठी अडून बसले होते; पण त्यांना शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. आता उपाध्यक्षपदासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेला नाही. कदमांना उपाध्यक्षपद देऊन तोडगा काढायचा की नव्यांना संधी द्यायची, याबाबत हालचाली नेतेमंडळींनी सुरू केल्या आहेत.
उदयनराजे भोसले माझे नेते आहेत. उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांनी मला सूचना केलेली नाही. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी कामकाजाच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या. मी स्वत: हून त्यांना राजीनामा देऊ का?, असे कसे विचारू?
- रवी साळुंखे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद