निर्णयप्रक्रिया अडकली; म्हणून आग भडकली

By admin | Published: December 25, 2014 09:45 PM2014-12-25T21:45:06+5:302014-12-26T00:52:05+5:30

खंडाळ्याला लालफितीचा चटका : जमीन संपादन करुनही अग्निशमन यंत्रणेचा पत्ताच नाही

Decision process stuck; So the fire broke out | निर्णयप्रक्रिया अडकली; म्हणून आग भडकली

निर्णयप्रक्रिया अडकली; म्हणून आग भडकली

Next

शिरवळ : खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ, लोणंद व खंडाळा परिसरात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे मात्र आगीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित होऊनही अद्यापही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा कधी कार्यान्वित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कंपन्यांमध्ये आगीसारखे दुर्दैवी प्रकार होऊन नुकसान होऊ नये, याकरिता केसुर्डी टप्पा क्र. १ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी रवी खेबुडकर यांनी पुढाकार घेऊन महामार्गालगतच अग्निशमन यंत्रणेसाठी जागा संपादित केली होती. खेबुडकर यांच्या बदलीनंतर संबंधित अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडलेला आहे. औद्योगिकतेचा टप्पा क्र. २ पूर्ण होऊनही अद्यापही अग्निशमन यंत्रणेचा ठावठिकाणा लागलेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सध्यातरी गांधारीच्या भूमिकेतून वावरताना दिसत आहे.
साधारणपणे शिरवळजवळील गावडेवाडी या ठिकाणी भंगारच्या दुकानाला आग लागून सुदैवाने जीवितहानी न होता वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊन लाखो रुपयांचे नुकसान त्याठिकाणी झाले होते. या दुकानाला आग तब्बल दोन वेळा लागली. संबंधिताला मोठ्या प्रमणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर राष्ट्रीय महामार्गावरच अचानकपणे मालट्रकने पेट घेऊन वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. अशातच पंधरा दिवसांपूर्वीच शिरवळ याठिकाणी डॉल्बी सिस्टीमला आग लागून सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. तर बुधवार, दि. २४ रोजी दुकानांना आग लागून २५ लाखांचे नुकसान झाले.
दरम्यान, बुधवारी लागलेल्या आगीवेळी अग्निशमन बंब त्वरित उपलब्ध झाले असते तर वित्तहानी टाळता आली असती. मात्र, नागरिकांनी भुर्इंज येथील किसन वीर कारखाना याठिकाणी संपर्क साधला असता, संबंधितांनी कारखाना सुरू असल्याने बंब पाठविण्यास नकार दिला. तर वाई, महाबळेश्वर येथील अग्निशमन केंद्रांतील दूरध्वनी केवळ खणखणतच राहिले. दरम्यान, पोलिसांनी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत केलेल्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. नाही तर आगीने रौद्ररूप धारण करून मेनरोडवरील तब्बल १५ ते २० दुकानांना या आगीमुळे नुकसान सोसावे लागले असते.
दरम्यान, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होऊनही व आगीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडूनही औद्योगिक विकास महामंडळाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. येथील अग्निशमन केंद्रासाठी संपादित केलेली जमीन केवळ शोपीस ठरली आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने अग्निशमन केंद्रासाठी सकारात्मकता दाखवूनही तो प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला आहे. (प्रतिनिधी)

खेबुडकर यांची कार्यतत्परता
शिरवळ, ता. खंडाळा, येथे आग लागल्याचे वाईचे प्रांताधिकारी रवी खेबुडकर यांना समजताच त्यांनी तातडीने याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिली. त्यानंतर त्यांनी स्वत: भुर्इंज, वाई, महाबळेश्वर याठिकाणी दूरध्वनीद्वारे अग्निशमन बंब पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या. मात्र, त्यांनाही येथील भोंगळ कारभाराचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई येथे संपर्क साधत हिंजवडी व सासवड पुणे येथील अग्निशमन यंत्रणा पाठविण्याच्या हालचाली केल्या.

Web Title: Decision process stuck; So the fire broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.