निढळला जनता कर्फ्यूचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:10+5:302021-04-23T04:42:10+5:30
पुसेगाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर ...
पुसेगाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार (दि. २१)पासून ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून निढळमधील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तरी खबरदारी म्हणून निढळ गाव बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. निढळ हे या परिसरात बाजारपेठ असलेले मोठे गाव आहे व आसपासच्या भागातील नागरिकांची वर्दळ या ठिकाणी नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने ३० एप्रिलपर्यंत गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत फक्त औषध दुकाने, दवाखाने आणि दूध संकलन केंद्रे सुरू राहणार आहेत. सरपंच बायडाबाई ठोंबरे, उपसरपंच श्रीकांत खुस्पे, ग्रामसेवक बबन ढेंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊनला सहकार्य करण्याविषयी व्यापारी, व्यावसायिक व ग्रामस्थांना सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
२२निढळ
निढळ (ता. खटाव) येथे लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे.