Lok Sabha Election 2019 घराण्यासाठी वाद थांबविण्याचा निर्णय: शिवेंद्रसिंहराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:01 PM2019-04-15T23:01:50+5:302019-04-15T23:02:07+5:30
शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू ...
शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाहीत. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलीन होऊ नये म्हणून हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया,’ असे आवाहन आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ सोनगाव, ता. सातारा येथे आयोजित शेंद्र्रे व परळी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उदयनराजे भोसले, सारंग पाटील, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, कमल जाधव, वनिता पोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘उरमोडीचे धरण झाले आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरितक्रांती घडेल. मात्र त्यासाठी आघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खूश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशात हुकूमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.’
हे नाणं ओरिजनल आहे.. उदयनराजे
‘निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात, त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिजनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.’