तळमावले-ढेबेवाडीत दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:02+5:302021-04-22T04:40:02+5:30
ढेबेवाडी : कोरोनाने शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने दिवसेंदिवस आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनावरही ...
ढेबेवाडी : कोरोनाने शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने दिवसेंदिवस आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनावरही मोठा ताण येत आहे. यामुळे या सर्व बाबींचा विचार करून ढेबेवाडी आणि तळमावले या पाटण तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी बुधवारपासून सलग दहा दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पोलिसांसह प्रशासनालाही कळवला असून, त्यानुसार स्थानिक ग्रामपंचायतींंनीही नोटीस जाहीर केली आहे.
पाटण तालुक्यातील बहुतेक गावात कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असतानाच कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे-मुंबईहून गावा-गावात चाकरमानी परतू लागले आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यातच या विभागातील ढेबेवाडी आणि तळमावले या दोन महत्त्वपूर्ण बाजारपेठेत अलीकडे विनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढतच चालली होती.
सुमारे साठ गावे आणि शंभरवर वाड्या-वस्त्यांसह कराड-पाटण तालुक्यातील अनेक गावांतील जनतेसाठी सर्व सोयींनीयुक्त बाजारपेठा म्हणून तळमावले आणि ढेबेवाडी ओळखल्या जातात. मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि स्थानिक सरपंच, पदाधिकारी आणि व्यापारी अशा संयुक्तिक बैठका दोन्ही बाजारपेठेत झाल्या. त्यावेळी प्रांताधिकारी तांबे आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी प्रशासनाच्यावतीने कोरोना संकट काळात घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याबाबत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
त्यावेळी उपस्थित व्यापारी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी बाजारपेठच सलग दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रशासनालाही कळविण्यात आला. अत्यावश्यक सेवा यामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल सेवा चालू राहतील, असेही ठरले आहे.