Satara: 'त्या' घटनेनंतर महाबळेश्वरात डीजे बंदीचा निर्णय
By सचिन काकडे | Published: October 27, 2023 06:38 PM2023-10-27T18:38:55+5:302023-10-27T18:39:47+5:30
जखमी मुलांच्या उपचारासाठी 'एक हात मदतीचा' अभियान सुरू
महाबळेश्वर : दुर्गादेवी विसर्जनादिवशी महाबळेश्वरात जनरेटरचा स्फोट होऊन सात लहान मुलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेबाबत खेद व्यक्त करतानाच शहरात डीजे बंदीचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी स्थानिक मंडळाकडून घेण्यात आला.
महाबळेश्वरात मंगळवारी (दि. २४) सायंकाळी दुर्गादेवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असतानाच कोळी आळी येथे जनरेटरचा स्फोट झाला होता. यावेळी उडालेल्या आगीच्या भडक्यात चार ते सहा वयोगटातील सात लहान मुले व दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. जखमी मुलांवर सध्या सातारा व पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी महाबळेशरात रणमर्द मराठा मंडळासह स्थानिक मंडळांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महाबळेश्वर शहरात डीजे बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच जखमी मुलांच्या उपचारासाठी 'एक हात मदतीचा' अभियान सुरू करण्यात आले. मंडळांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक करण्यात आले.