पिंपोडे बुद्रुक परिसरात यंदा घेवडा उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:30 AM2017-10-23T10:30:37+5:302017-10-23T10:51:26+5:30
पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्याची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट उद्भवले आहे.
पिंपोडे बुद्रुक, दि . २३ : पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्याची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट उद्भवले आहे.
परिसरातील पिंपोडे बु्रद्रुक, सोनके, नांदवळ, करंजखोप, वाघोली परिसरात खरीप हंगामात घेवडा पिकाचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. घेवडा पिकातून मिळणाऱ्या आर्थिक मिळकतीवरच या परिसरातील शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत असते; परंतु यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे घेवड्याचे उत्पादन घटले आहेच.
याशिवाय काढणी काळात पावसाचा दीर्घकाळीन मुक्काम राहिल्याने घेवड्याचे अतोनात नुकसान झाले असून, पावसात भिजलेला घेवडा लाल पडला असल्या कारणाने व्यापाऱ्यानी घेवडा खरेदीबाबत अनुत्सुकता दाखवली आहे.
या उलट काही ठिकाणी घेवड्याची खरेदी केली जात असली तरी ती अत्यंत निच्चांकी दराने होत आहे. त्यामुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकूणच ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा घेवडा अजूनही घरी पडून असल्याने दिवाळीत शेतकऱ्यावर आर्थिक संकट उद्भवले आहे.