शनैश्वर देवस्थानकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:56+5:302021-08-02T04:14:56+5:30
पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची रुग्णवाहिकेअभावी होणारी गैरसोय जाणून ...
पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची रुग्णवाहिकेअभावी होणारी गैरसोय जाणून सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या हस्ते केले.
यावेळी देवस्थानचे सचिव अविनाश लेंभे, डॉ. महाजन, विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक प्रबोधनाचे अधिष्ठान म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यात श्री सोळा शिवलिंगे शनैश्वर देवस्थानाचा सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांशी काळ धार्मिक स्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळांकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांवर मर्यादा येत असताना देखील देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी परिसरातील जनतेची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने रुग्णवाहिका खरेदी करून तिचे लोकार्पण केले.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नेहमीच सामाजिक हिताचे उपक्रम राबविले जातात. सामान्य जनतेचे रुग्णवाहिकेअभावी होणारे हाल लक्षात घेऊन ट्रस्टने रुग्णवाहिका लोकार्पित केली आहे. यापुढेही परिसरातील जनतेच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी शनैश्वर देवस्थान प्रयत्नशील राहील.
- शिवयोगी नंदगिरी महाराज मठाधिपती,
शनैश्वर देवस्थान, सोळशी