दीनवाणा ठरतोय महिला लोकशाही दिन!
By Admin | Published: March 18, 2015 10:04 PM2015-03-18T22:04:25+5:302015-03-18T23:58:49+5:30
दोन महिन्यात तीन तक्रारी : अन्यायग्रस्त महिलांना धाडसाने पुढे येण्याचे आवाहन
प्रदीप यादव - सातारा -महिलांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, या हेतूने प्रशासनाने महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी खास महिलांसाठी ‘महिला लोकशाही दिन’ सुरू केला आहे. मात्र, या लोकशाही दिनात येणाऱ्या तक्रारींची संख्या पाहता खरंच दीनवाणे वाटते. या महिन्यात केवळ दोनच महिलांनी आपला तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तर गेल्या महिन्यात केवळ एक तक्रार दाखल झाली होती. अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत तक्रारींची वाट पाहात बसावे लागले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी महिला लोकशाही दिन झाला. सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत या लोकशाही दिनात केवळ दोनच महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्याजवळ लेखी स्वरूपात आपले गाऱ्हाणे मांडले. यामध्ये एक कौटुंबिक छळाची तक्रार तर दुसरी पतीच्या निधनानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याची तक्रार आहे. दोन्ही तक्रारी साताऱ्यातील आहे.
तालुकास्तरावर उदासीनता
तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेतला जातो. याठिकाणी दाखल झालेल्या तक्रारी पुढे जिल्हास्तरावर पाठविल्या जातात. मात्र, आज कोणत्याच तालुक्यातून तक्रार पुढे आलेली नाही. महिलांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुविधा उपलब्ध आहे. तक्रारींचा निपटारा वेळेत व्हावा, यासाठी अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करायला हवे. असे झाल्यास महिलांचे मनोबल वाढून त्या आपल्या तक्रारी घेऊन पुढे येतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विविध स्तरांवर मागता येते दाद
महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन घेतला जातो. त्याठिकाणी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान झाले नाही तर तक्रारदाराला जिल्हास्तरावर दाद मागता येते. जिल्हास्तरावर न्याय नाही मिळाला तर विभागीय स्तरावर आणि येथे तक्रारींचा निपटारा झाला नाही तर तक्रारदाराला राज्यस्तरावर होणाऱ्या महिला लोकशाही दिनात दाद मागता येते. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखता यावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, यासाठी महिलांनी अन्याय सहन न करता धाडसाने पुढे यायला हवे, असे ढवळे यांनी सांगितले.
महिन्यात तक्रारींचे निवारण
महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल झाल्यानंतर एक महिन्यात त्याचे निवारण केले जाते. दाखल झालेल्या तक्रारी ज्या-त्या विभागाकडे पाठविल्या जातात. तक्रारदारांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
महिलांनी अन्याय सहन करत बसण्यापेक्षा न्यायासाठी धडपड करायला हवी. महिला आपल्या तक्रारी सांगत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास महिला लोकशाही दिन सुरू केला आहे. महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. पण महिलांनी पुढे यायला हवे.
- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी