ईडीने संशयित दीपक देशमुख यांना घेतले ताब्यात, साताऱ्यातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:04 PM2024-09-05T14:04:07+5:302024-09-05T14:05:35+5:30
सातारा : मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात फसवणुकीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या मायणी मेडिकल काॅलेजचे ...
सातारा : मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात फसवणुकीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या मायणी मेडिकल काॅलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी दुपारी साताऱ्यातून ताब्यात घेतले.
दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्याकडे आहे. सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह त्यांना अटी व शर्थीवर संबंधित गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. तर दुसरीकडे दाखल एका अन्य गुन्ह्यात ईडी दीपक देशमुख यांच्या शोधात होती.
दीपक देशमुख हे साताऱ्यात आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्यांची ४ सप्टेंबर रोजी हजेरी होती. या प्रकरणात दीपक देशमुख बुधवारी सकाळी ११ वाजता साताऱ्यातील आर्थिक गुन्हे शाखेत आले. तपासासाठी शाखेत गेल्यानंतर दोन मिनिटांमध्ये ईडीचे पथक एलसीबीच्या मागच्या बाजूच्या दरवाजातून आर्थिक गुन्हे शाखेत गेले. ‘हम ईडी विभाग से हैं,’ असे म्हणत त्यांचा ताबा घेत असल्याचे सांगितले. सुमारे दीड तास तेथेच चौकशी केल्यानंतर ईडीचे पथक त्यांना तेथून घेऊन गेले.
ईडीकडून पोलिसांशी पत्रव्यवहार..
दीपक देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडीने सातारा शहर पोलिसांना पोलिस बंदोबस्त मागणीचे पत्र दिले. त्यानंतर शहर पोलिसांनी त्यांना बंदोबस्त दिला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील चाैकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर पथक मुंबईला गेले.