दीपालीच्या आत्महत्येने नातेवाइकांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:04+5:302021-03-27T04:41:04+5:30

सातारा : लग्नापूर्वी काही वर्षे साताऱ्याच्या व्यंकटपुरा पेठेत राहणाऱ्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे साताऱ्यातील त्यांच्या नातेवाइकांना धक्का ...

Deepali's suicide shocks relatives | दीपालीच्या आत्महत्येने नातेवाइकांना धक्का

दीपालीच्या आत्महत्येने नातेवाइकांना धक्का

Next

सातारा : लग्नापूर्वी काही वर्षे साताऱ्याच्या व्यंकटपुरा पेठेत राहणाऱ्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे साताऱ्यातील त्यांच्या नातेवाइकांना धक्का बसला आहे. ही सर्व मंडळी शुक्रवारी सकाळीच अमरावतीला पोहोचली. काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य रजनी पवार यांच्या त्या भाची होत्या. दीपालीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संबंधित दोन्ही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिच्या साताऱ्यातील नातेवाइकांनी केली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण य‍ांनी गुरुवारी (दि. २५) आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी मृत्युपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. चव्हाण कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील. दीपाली यांचे वडील दापोली येथे कृषी विद्यापीठात अधिकारी होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच दीपाली यांच्या भावाचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे हे कुटुंब भावनिकदृष्ट्या खचले होते. दीपाली आईसह साताऱ्यात व्यंकटपुरा पेठेतील बहिणीच्या घराजवळ स्थायिक झाल्या. येथे त्यांचा फ्लॅटही आहे. साताऱ्यातच त्यांनी तडफेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून वनविभागात पोस्टिंग मिळविली. २०१४ मध्ये धूळघाट रेल्वे येथे त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली.

रजनी पवार यांच्या सूनबाई प्रेरणा पवार यांच्या दीपाली या धाकटी बहीण होत्या. रजनी पवार यांनी सांगितले, ती अत्यंत शांत व पण कामाप्रती प्रचंड आस्था असणारी मुलगी होती. अधिकारी म्हणून ती तितकीच धाडसी होती. मेळघाट भागात तिला ‘लेडी सिंघम’ म्हणून लोक ओळखत होते. दोनच वर्षांपूर्वी तिचा विवाह अमरावतीचे अधिकारी मोहिते यांच्याशी झाला. सध्या चिखलदरा येथे कार्यालयात मोहिते अधिकारी आहेत. साताऱ्याच्या ठोसेघरमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता, अशा आठवणी रजनीताई यांनी सांगितल्या.

दीपाली यांची आई सध्या काही दिवस हरिसाल येथे दीपालीबरोबर होती. गुरुवारी (दि. २५) सकाळीच त्या साताऱ्याला यायला निघाल्या आणि तिथे ही दुर्दैवी घटना घडली. वरिष्ठांच्या त्रासामुळे दीपाली यांचे साताऱ्याकडे बदली करून घेण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे पवार यांनी सांगितले.

दीपालीला त्रास देऊन प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे. जेणेकरून नोकरीत प्रशासकीय जाच सहन करणाऱ्या शेकडो दीपालींचे जीव वाचतील, अशी प्रतिक्रिया रजनीताई पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

चौकट

साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शीतल राठोड, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे व दीपाली चव्हाण हे तिघे एकाच बॅचचे होते. कुंडल (जि. सांगली) येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी एकत्रच ट्रेनिंग घेतले होते. दीपाली यांच्या आत्महत्येची वार्ता समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. अत्यंत अभ्यासू व कष्टाळू अशी सहकारी गमावल्याची खंत राठोड आणि झांझुर्णे यांनी व्यक्त केली.

_______________

Web Title: Deepali's suicide shocks relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.