Satara: महाबळेश्वरच्या सीमेवरील जंगलात हरणाची शिकार, चौघांच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:45 PM2024-04-08T12:45:47+5:302024-04-08T12:46:11+5:30
गावठी बंदूक, काडतुसे, कोयता जप्त
महाबळेश्वर (जि. सातारा) : मेढा व महाबळेश्वर तालुक्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात पिसोरी हरणाची शिकार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वन विभागाने अटक केली. शिवाजी चंद्रकांत शिंदे, दीपक शंकर शिंदे, आदित्य दीपक शिंदे (तिघे रा. कुरोशी, ता. महाबळेश्वर) व गणेश कोंडिबा कदम (रा. गोगवे, ता. महाबळेश्वर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या टोळीकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी गावठी बंदूक, काडतुसे, वाघर, कोयता व शिकार केलेली पिसोरी हरिणाचा मृतदेह जप्त केला आहे. महाबळेश्वर व मेढा वन विभागच्या संयुक्त पथकानेही कारवाई केली आहे.
रविवारी पहाटे महाबळेश्वर व मेढा येथील वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना राजमार्गावरील मोळेश्वर फाटा ते सह्याद्रीनगर रस्त्यावर राखीव वनात दोन व्यक्ती संशयीतरीत्या आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोघांचा संशय आल्याने त्यांनी त्या दोघांची चौकशी सुरू केली.
वन कर्मचाऱ्यांनी दोघांजवळील साहित्यांची तपासणी केली असता शिकारी टोळीचे बिंग फुटले. त्या दोघांजवळ पिशवीत वाघर, काडतुसे व कोयता आढळून आला. पकडलेल्या दोघांकडून गावठी बंदूक व बंदुकीच्या मदतीने शिकार केलेली पिसोरी हरिण व इतर साहित्य जप्त केले.