पराभव काँग्रेसच्या जिव्हारी; विजय राष्ट्रवादीसाठी चिंतनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:34 AM2021-01-21T04:34:50+5:302021-01-21T04:34:50+5:30
कोपर्डे हवेली : तालुक्यातील कोपर्डे हवेली हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ...
कोपर्डे हवेली : तालुक्यातील कोपर्डे हवेली हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी पारंपरिक लढत झाली. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी गटाला सत्ता कायम राखण्यात यश आले. तर एका मताने एक उमेदवार पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेसची सत्तांतराची संधी हुकली. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आठ तर कॉंग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले.
राष्ट्रवादी पॅनेलचे नेतृत्व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण व माजी संचालक बळवंतराव चव्हाण यांनी केले. तर कॉंग्रेस पॅनेलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण आणि कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी केले. प्रचाराच्या रणधुमाळीत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या गटाने दहा वर्षांत केलेली विकासकामे मतदारांसमोर ठेवली होती. तर शेवटच्या काही दिवसांत कॉंग्रेसने प्रलंबित असलेले घनकचरा निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि आरोग्य केंद्राचा धागा पकडून सत्ताधारी गटावर निशाणा साधत प्रचारातील पिछाडी भरून काढली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना प्रलंबित आरोग्य केंद्राचा मुद्दा कळीचा ठरला.
अटीतटीच्या लढतीत विरोधकांचा एक उमेदवार एका मताने पराभूत झाल्यामुळे सत्तांतराची संधी हुकली. आणि सत्ताधारी गटाला सत्ता राखण्यात यश आले. प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले. तर प्रभाग दोनमध्ये काँग्रेसने बालेकिल्ला राखला. प्रभाग तीन, चार व पाचमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. दोन्ही गटाकडून एकतर्फी विजयाचे दावे केले जात होते. ते सर्व दावे मतदारांनी फोल ठरवत दोन्ही गटांना विजयासाठी संघर्ष करायला लावून कोणीही मतदारांना गृहीत न धरण्याचा जणू इशाराच दिला.
प्रलंबित असलेल्या विकासकामांना काँग्रेस गटाने प्रचाराच्या केंद्रस्थानी घेतल्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादी गटाला सोपी वाटणारी लढाई अटीतटीची झाली. प्रभाग एक राष्ट्रवादी आणि प्रभाग दोन काँग्रेस गटासाठी प्रतिष्ठेचा झाल्यामुळे या दोन प्रभागात नेते आणि कार्यकर्ते अडकून पडले. त्याचा तोटा राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या प्रभाग तीन आणि पाचमध्ये झाला. या दोन्ही प्रभागात काँग्रेसला एक-एक उमेदवार विजयी करण्यात यश आले. तर कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला. प्रभाग तीनमध्ये अत्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली. याठिकाणी राष्ट्रवादीचे दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. कॉंग्रेसच्या एक उमेदवारचा याठिकाणी एका मताने पराभव झाला. आणि परिणामी हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली.
- चौकट
सत्ता टिकविण्यासाठी कामांना गती द्यावी!
केवळ एका मताने झालेला पराभव कॉंग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला. तर काठावर मिळालेले यश राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. जनतेने सत्ताधारी गटाच्या बाजूने कौल दिला असला तरी काठावर आलेली सत्ता भविष्यात टिकवण्यासठी प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे.
- चौकट
विजयी उमेदवार
दत्तात्रय चव्हाण, शकुंतला चव्हाण, शुभांगी चव्हाण, अमित पाटील, वंदना लोहार, शोभा चव्हाण, नेताजी चव्हाण, स्मिता लोहार, अंजनी चव्हाण, रघुनाथ खरात, नानासाहेब चव्हाण, सीमा साळवे, सुनील सरगडे, दत्तात्रय काशीद, उज्ज्वला होवाळ.
- चौकट
काँग्रेसचे चौघे अल्प मताने पराभूत
प्रभाग ३ मधून कैलास चव्हाण सहा मतांनी तर अनिता यादव एकमताने पराभूत झाल्या. प्रभाग ४ मधून लता साळवे सात मताने व प्रभाग ५ मधून रमेश सरगडे सात मताने पराभूत झाले.