काँग्रेसचा हार, सेनेचा बुके; उदयसिंह जाणार कुठे? -कारण राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:08 AM2019-07-25T00:08:22+5:302019-07-25T00:09:18+5:30
क-हाड दक्षिणचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघातून विजयाची सप्तपदी पूर्ण केली. मात्र
प्रमोद सुकरे ।
क-हाड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत संघटनेचे अॅड. उदयसिंह पाटील यांचा वाढदिवसही झोकातच झाला; पण यानिमित्ताने काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी त्यांना घातलेला पुष्पहार अन् सेनेच्या नेत्यांनी दिलेल्या बुकेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. आता यातला हार की बुके उदयसिंह पाटील यांना आवडला, याचं उत्तर काही महिन्यांत मिळेलच.
क-हाड दक्षिणचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघातून विजयाची सप्तपदी पूर्ण केली. मात्र, गत निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली अन् उंडाळकरांच्या विजयरथाला ब्रेक लागला. बंडखोरी फळाला आली नाही. आता उंडाळकर गट रयत संघटनेच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करीत आहे.
खरंतर उंडाळकरांच्या रयत संघटनेला गतवर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. त्याचा एक दिमाखदार सोहळाही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कºहाडला झाला होता. तर आता काँग्रेसवर नाराज असल्याने रयत संघटनेची पताका खांद्यावर घेऊन अॅड. उदयसिंह पाटील वाटचाल करीत आहेत. असो.. पण राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र-अथवा शत्रू नसतो. म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना ‘कोयने’चे पेढे भरवत उदयसिंह पाटील यांनी नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात केली. त्यातून कृष्णेची सत्ता भोसलेंना तर बाजार समितीची सत्ता उदयसिंह पाटील यांना मिळाली; पण, हे मैत्रिपर्व पुढे फार काळ टिकले नाही. कºहाड पालिका निवडणुकीत छुपी युती करणाऱ्या भोसले व उदयसिंह पाटील यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खूपच बिघडले अन् रयत संघटनेच्या जोरावर उंडाळकर गट पंचायत समितीच्या राजकारणात सत्तेत बसला.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील यांच्या मनोमिलनाचे वारे वाहू लागले. अनेक गावांत काँग्रेस अंतर्गत दोन्ही गटांचे लोक एकत्रित येऊन निवडणुका लढवू लागले. काही कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील एकत्रित दिसू लागले. त्याचाच परिपाक म्हणून मलकापूर नगरपालिका निवडणुकीत ‘मनोहारी’ नेतृत्वाने दोन गटांचे ताल-सूर जुळवले अन् काँग्रेसची सत्ता आली. त्यामुळे दोन गटांत मनोमिलन झाल्याचा संदेश गेला; पण दोन महिन्यांपूर्वी उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकायचाच, असा निर्धार व्यक्त केला अन् कसं अन् कोणी लढायचं, याचा निर्णय नेत्यांवर सोडून दिला. त्यानंतर उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाच्याही चर्चा रंगू लागल्या.
अनेक कार्यक्रमांत उदयसिंह पाटील यांना सत्कारावेळी जाणीवपूर्वक भगवी शाल देण्यात येऊ लागली. त्यामुळे उदयसिंह पाटील दक्षिणच्या मैदानात धनुष्यबाण घेऊन उतरणार, अशा चर्चा रंगू लागल्या. उदयसिंह पाटील यांनी मात्र पुन्हा आमदारकी खेचून आणण्यासाठी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. आता ही निवडणूक उदयसिंह पाटील हातात हात घालून की हातात धनुष्यबाण घेऊन लढणार, हे पाहावे लागेल.
पेढा ‘कोयना’चा की ‘प्रथम’चा ?
उदयसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे केलेले आयोजन ही विधानसभेचीच चाचपणी मानावी लागेल. यावेळी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर शुभेच्छांचा वर्षाव केलाच; पण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भला मोठा हार सत्काराला आणला होता. तो उदयसिंह पाटील यांना घालताना कार्यकर्त्यांनी या दोघांच्या गळ्यात एकत्रित घातला. त्यावेळी मनोहर शिंदेंनी उदयसिंह पाटलांना पेढाही भरवला म्हणे; पण तो ‘कोयने’चा होता की ‘प्रथम’चा हे काही कळाले नाही.
शुभेच्छा वाढदिवसाच्या की नव्या इनिंगच्या?
वाढदिनी रात्री उशिरा शिवसेनेचे उपनेते, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनीही उदयसिंह पाटील यांना बुके देऊन शुभेच्छा दिल्या. आता या शुभेच्छा वाढदिवसापुरत्या मर्यादित होत्या की नव्या इनिंगसाठी होत्या? याबाबत चर्चा तर होणारच.