नीरा घाटावरील कठडा हटविला!
By Admin | Published: June 23, 2017 12:58 AM2017-06-23T00:58:30+5:302017-06-23T00:58:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद : नीरेच्या दत्त घाटाला कठड्याचे कुंपण घालण्यात आल्याने स्नानाचा सोहळा पार पाडण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी स्वत: तेथे हजर राहून कुंपण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही तासांतच हे कुंपण हटविण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माउलींच्या पादुकांना पालखी सोहळ्यातील पहिले आणि एकमेव अभ्यंगस्नान नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे घातले जाते. यासाठी बुधवारी काँक्रिटीकरण व लोखंडी कुंपण तयार केले होते. मात्र, या बंदिस्त कुंपणामुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. भाविकांना अभ्यंगस्नान सोहळा अनुभवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार होते. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत स्वत: जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी नीरेच्या दत्त घाटावर धाव घेतली. समक्ष पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांनी लोखंडी कठडे तत्काळ हटवून घाट मोकळा करून घेतला. तसेच नीरा नदीपात्रातील साचलेला कचरा मशिनरीद्वारे काढण्याचे आदेश दिले. भाविकांची ही अडचण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे भाविकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
--
नीरा नदीच्या दत्त घाटात दि. २४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अभ्यंगस्नान होणार आहे. त्यावेळी भक्तगणांना व वारकरी भाविकांना कोणताही पाण्याचा तुटवडा जाणवणार नसून, वीर धरणातून पालखी सोहळ्यासाठी जो राखीव पाणीसाठा ठेवलेला असतो, तो नीरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे.
- व्ही. बी. मैत्री, शाखा अभियंता, वीर धरण