किल्ल्यावर वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:30+5:302021-03-18T04:39:30+5:30
सातारा : समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वनसंपदेचे अस्तित्व ...
सातारा : समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वनसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींमधील काही रहिवासी येथील झाडांचा उपयोग इंधन म्हणून करतात. वृक्षतोड करणा-यांवर वनविभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पारा ३२ अंशांवर
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता ओसरली असून, उकाडा जाणवू लागला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमानही दोन दिवसांपासून ३६ अंशांवर पोहोचले आहे. बुधवारी हवामान विभागाने शहराचे कमाल तापमान ३६.४ तर किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. उकाडा वाढल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे.
वाहतुकीचे तीनतेरा
सातारा : साता-यातील तहसील कार्यालय आवारात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. पार्किंगसाठी जागा अपुरी पडू लागल्याने वाहनचालक रस्त्याकडेला गाड्या लावत आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातून कामकाजासाठी येणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
व्हॉल्व्हला गळती
सातारा : शहरातील बुधवारनाका चौकात असलेल्या एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सायंकाळी या पेठेला पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर या व्हॉल्व्हमधून सातत्याने पाणी वाहत असते. एकीकडे पालिका पाणीबचतीचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डुकरांचा सुळसुळाट
सातारा : साता-यातील दाट लोकवस्तीच्या सदर बझार झोपडपट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेकडून याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आली नाही. उघड्यावरून वाहणारे सांडपाणी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लास्टिकचा वापर
सातारा : सातारा पालिकेने कारवाई करूनही शहरातील हातगाडीधारकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅण्ड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. पालिकेची दंडात्मक मोहीम थंडावल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
भाज्यांचे दर उतरले
फलटण : साता-यातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर उतरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वांगी, वाटणा, बटाटा, कोबी, फ्लॉवर यासह सर्वच पालेभाज्यांचे दर २० ते ३० रुपये किलोवर आले आहेत. टोमॅटो, मेथी, कोथिंबिरीचे दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांमधून मागणी वाढली आहे.
कठड्यांची दुरवस्था
वाई : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. काही ठिकाणचे कठडे केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहतुकीसाठी हा घाट प्रशस्त असला तरी बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करावी, धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.