अतिक्रमण हटविल्यास रस्त्यावर उतरू -- बंद आंदोलनात दीडशे विक्रेत्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:26 AM2019-11-26T11:26:04+5:302019-11-26T11:26:22+5:30
जागा निश्चिती करून त्यांना ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.
सातारा : नगरपालिका, बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्यावतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला. सातारा शहरातील सुमारे दीडशे हातगाडीधारक व विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जर कोणी अतिक्रमण हटवित असेल तर रस्त्यावर उतरू, असा इशाराही संघटनेच्यावतीने यावेळी देण्यात आला.
हातगाडीधारक व विक्रेत्यांचे जोपर्यंत पुर्नवसन केले जात नाही, तोपर्यंत ते शहरात कोठेही आपला व्यवसायकरू शकतात. उच्च न्यायालयाने २०१४ रोजी असे आदेश महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मात्र, या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात न आल्याने हाकर्स संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, विक्रेत्यांना बायोमेट्रिक सर्व्हे तातडीने करण्यात यावा, जागा निश्चिती करून त्यांना ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, नगरपालिका, टाऊन वेल्डिंग कमिटी व बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहेत. यावेळी हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष संजय पवार, प्रशांत धुमाळ, विनोद मोरे, पिरमोहम्मद बागवान आदी उपस्थित होते.