तासिका तत्त्वावरील प्राध्यापक झाले डिलिव्हरी बॉय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:19+5:302021-09-09T04:46:19+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कष्टपूर्वक शिक्षण घेऊन स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम होण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या तासिका तत्त्वावरील ...
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कष्टपूर्वक शिक्षण घेऊन स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम होण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न गंभीर होऊ लागले आहेत. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांना चक्क डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. याबरोबरच काही शेतमजूर, तर कोणी दुकानात कामगार म्हणूनही कार्यरत आहेत.
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांसोबतच कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही हजारो सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. असे असतानाही १५ ऑगस्ट २०२१ मध्ये या प्राध्यापकांचे काम थांबविण्यात आले आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अक्षरश: डिलिव्हरी बॉय, शेतमजुरी यासह दुकानांमध्ये काम करण्याची वेळ आली आहे. राज्यात सुमारे १८ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडेचार हजार जागा भरण्याची शासनाने परवानगीही दिली. त्याला उच्चशिक्षण मंत्रालयाकडून परवानगी दिली; मात्र वित्त विभागाने निधी नसल्याचे कारण पुढे केल्याने ही प्राध्यापक भरती रखडली. परिणामी सहायक प्राध्यापकांच्या अर्थार्जनाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर नोकरी करताना जे निकष ठरविले आहेत, त्यानुसार हजारो युवक, युवती तासिका तत्त्वावर काम करत आहेत. अनेकांनी पीएच.डी. मिळविलेली आहे. मात्र एवढे शिक्षण घेऊनही जर बेरोजगार राहण्याची वेळ येत असेलल तर या शिक्षणाचा उपयोग काय, असा प्रश्न हे प्राध्यापक विचारत आहेत.
चौकट :
संघर्षातून यशाची वाट शोधण्याची ऊर्जा
कोविडच्या काळात आलेले नैराश्य एकाही तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकावर गारूड झाले नाही. आयुष्याने जसे फासे टाकले अगदी तसंच त्यांची उत्तर सोडवत हे प्राध्यापक लढले. म्हणूनच नैराश्याच्या गर्तेत अडकून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या अनेकांप्रमाणे जिल्ह्यातील एकाही प्राध्यापकाने मृत्यूला कवटाळले नाही. संघर्षातून यशाची वाट शोधण्याची ऊर्जा शोधणाऱ्या या प्राध्यापकांना अद्यापही आपण कायमस्वरूपाच्या नोकरीत येऊ, अशी आशा आहे.
वधू परीक्षेत प्राध्यापक अनुत्तीर्ण!
दोन दशकं अभ्यासात घालविल्यानंतर विद्यापीठात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरही हाती कायमस्वरूपी नोकरी नसल्याने अनेकांची लग्ने लांबली आहेत. तिशी ओलांडलेल्या आणि नावापुढं डॉक्टर लावणाऱ्या अनेक वाग्दत् वरांना वधू परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची वेळ आली आहे. पदवी असूनही त्याचं मूल्य अवघे १४ आणि १८ हजार असेल, तर त्यात कसे भागणार, असा प्रश्न मुलीकडच्यांना पडला आहे. तर प्रयत्न करूनही नोकरीत कायम होता येत नाही, हे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे दुखणे आहे.
कोट :
प्राध्यापक व्हायचं म्हणून राज्य सरकारने नेट आणि सेट पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता यश अंतिम टप्प्यात आलं, असं वाटलं; पण मागच्या महिन्यात आमचं काम थांबवलं. त्यानंतर लगेचच मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम स्वीकारलं. पदव्यांनी शिक्षण दिलं, तर कष्टाची तयारी दाखवल्याने आर्थिक स्थैर्य दिले.
- सुभाष चव्हाण, डिलिव्हरी बॉय,
सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
-सेट-नेट झालेल्या शेकडो उच्चशिक्षितांची समस्याही गंभीर बनली आहे. उच्च
शिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे. त्यांची नियुक्ती किंवा रोजगार उपलब्ध
केला नाही, तर त्यांचे वय वाढेल. त्यांची कौशल्यशक्ती संपत आहे. नेट-सेट,
पीएच.डी, एमफील करण्यासाठी जीवनातील ७-८ वर्षे खर्ची घालावी
लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही.
-प्राध्यापक भरतीसाठी डोनेशन मागितले जाते. एवढा पैसा आणावा तरी
कुठून, त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून भरती प्रक्रियाही आयोगामार्फत
करावी. सहायक प्राध्यापकांनी प्रतिदिवस दीड हजार रुपये मानधन द्यावे.
१० वर्षांपासून लटकला प्रश्न
सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. राज्यातील १३ हजारांवर सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आंदोलने केल्यावर संघटनांना केवळ भरतीचे आश्वासन दिले जाते. परंतु पुढे काहीच केले जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती, तासिका दरात वाढ आदी प्रश्न प्रलंबितच आहेत.