पाडळोशी - दाढोली रस्त्याचे खोदकाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:48+5:302021-05-11T04:40:48+5:30
चाफळ : चाफळपासून पाडळोशीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गमेवाडीनजीक एका शेतकऱ्याने शेतात पाईपलाईन करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रातोरात रस्ता खोदला आहे. ...
चाफळ :
चाफळपासून पाडळोशीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गमेवाडीनजीक एका शेतकऱ्याने शेतात पाईपलाईन करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रातोरात रस्ता खोदला आहे. या खोदलेल्या रस्त्यावर व्यवस्थित भराव न टाकल्याने या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार गेल्या चार दिवसांपासून पडून जखमी झाले आहेत. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन रस्ता खोदकाम करणाऱ्या जेसीबी मालकाचा व शेतकऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी चाफळ परिसरातील वाहनचालकांबरोबरच ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी चाफळ पाडळोशी या मुख्य रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्तरमांड धरणातून पाणी घेऊन जाण्यासाठी पाईपलाईन करत असताना परवानगी न घेता रस्ता खोदला आहे. परिणामी रस्त्यांवर भराव न टाकता तसाच ठेवल्याने अनेक दुचाकीस्वार या खड्यात पडून जखमी होत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेल्या रस्त्याची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने तात्पुरती डागडुजी केली आहे. मात्र, काही शेतकरी चांगल्या प्रकारे असलेला रस्ता रातोरात जेसीबीच्या साह्याने खोदकाम करुन पाईप पुरून नेत आहेत. रस्ता खोदकाम करण्याचा कोणताही परवाना नसताना बांधकाम विभाग कारवाई करुन अशा लोकांवर गुन्हे का दाखल करीत नाही ? हा संशोधनाचा विषय ठरू पाहात आहे. चाफळपासून पाडळोशी दाढोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करुन पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी चाफळ परिसरातील वाहनचालकांच्या बरोबरच ग्रामस्थांनी केली आहे.