जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:09+5:302021-05-14T04:39:09+5:30
मसूर : कोपर्डे जिल्हा परिषद गटाचे सदस्य निवास थोरात यांनी तीन तास लसीकरण बंद पाडून वृद्धांना वेठीस धरल्याचा ...
मसूर : कोपर्डे जिल्हा परिषद गटाचे सदस्य निवास थोरात यांनी तीन तास लसीकरण बंद पाडून वृद्धांना वेठीस धरल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. ही बाब निषेधार्ह असून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवास थोरात यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मसूर ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.
मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश घाडगे, प्रा. कादर पिरजादे, सिकंदर शेख यावेळी उपस्थित होते.
सरपंच दीक्षित म्हणाले, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व तेवीस गावे येतात. मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही लसीकरण नियोजनबद्ध व सुरळीत सुरू आहे. शासनाने दुसऱ्या डोससाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशा सूचना दिल्या असून, उपलब्ध लस साठ्यापैकी ७० टक्के दुसऱ्या डोससाठी व ३० टक्के पहिल्या डोससाठी वापरण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाचे सदस्य निवास थोरात हे लसीकरण केंद्रावर आपल्या कार्यकर्त्यांसह आले, त्याठिकाणी येऊन त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या वृद्धांना उपाशीपोटी तीन तास ताटकळत उन्हात उभे राहावे लागले.
ते पुढे म्हणाले, थोरात यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला लस मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एकेरी भाषा वापरत कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असताना आरोग्य यंत्रणेचे मनोधैर्य वाढवण्याऐवजी खच्चीकरण करण्याची थोरात यांची भूमिका योग्य नाही. मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतीत त्यांच्या काही शंका होत्या तर त्यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली असती अथवा तक्रार करायला हवी होती. लोकप्रतिनिधी या नात्याने थोरात यांचे कृत्य अशोभनीय आहे. ही बाब निषेधार्ह असून, मसूर ग्रामस्थ या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.
चौकट
वरिष्ठांकडे करण्यात आली तक्रार
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांच्याशी दूरध्वनीवरून या घटनेबाबत संवाद साधला असता, ते म्हणाले की, वेळोवेळी रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष या नात्याने थोरात यांना योग्य ती माहिती देण्यात येते. जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात व कथित प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांनी सोमवारी लसीकरण बंद पाडत कर्मचाऱ्यांना तसेच मलाही दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. काहीजणांनी याचे व्हिडीओही केले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये थोरात यांनी केलेला आक्रस्ताळेपणा दिसून येत आहे. या घटनेने मला प्रचंड मानसिक धक्का बसला असून, मी वैद्यकीय रजेवर जात आहे. या घटनेबाबत मी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.