अजिंक्यतारा रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:42+5:302021-02-15T04:34:42+5:30
दुरुस्तीची मागणी सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ...
दुरुस्तीची मागणी
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. किल्ल्यावर सकाळी व सायंकाळी मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाकडून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने उर्वरित कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
मंडई परिसरात
घाणीचे साम्राज्य
सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. पालिकेच्या या मोहिमेला यशही आले. मात्र, गेल्या शहरातील भाजी मंडई परिसरात याविरुद्ध चित्र दिसू लागले आहे. महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कचरा कुंड्या हटविण्यात आल्या. पालिकेकडून येथील कचऱ्याचे दररोज संकलन केले जाते. तरीही अनेक विक्रेते विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला व इतर कचरा रस्त्यावर टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याचा विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वरचा
पारा १५ अंशांवर
महाबळेश्वर : सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या तापमानात सतत चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीत अचानक वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. हवामान विभागाने रविवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २८.१, तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंडीत वाढ झाल्याने पर्यटक येथील अल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.