अटकेची मागणी ही तर अकलेची दिवाळखोरी
By admin | Published: April 26, 2017 11:37 PM2017-04-26T23:37:06+5:302017-04-26T23:37:06+5:30
नानासाहेब भोसले : भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या हातातले बाहुले असल्याचा संदीप मोझर यांना टोला
सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांना, खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे राजकीय अस्तित्व नियंत्रित करणे हा अयशस्वी कुटिल डाव त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोणाला तरी साध्य करायचा आहे. पोलिस योग्य दृष्टीने परिस्थिती हाताळत असताना, कुणीतरी उठतो आणि उदयनराजेंना अटक करा, असे निवेदन देतो. त्यांची मागणी निव्वळ स्वार्थ्यांधामुळे आणि व्यक्ती द्वेषामुळे केली आहे. ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. असा टोला माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब भोसले यांनी संदीप मोझर यांचे नाव न घेता लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात नानासाहेब भोसले यांनी म्हटले आहे की, उदयनराजेंच्या अटकेसाठी प्रशासनावर दबाव आणताना मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा तो निंदनीय प्रकार आहे,’ ‘आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल झालेला गुन्हा निश्चितच दुर्दैवी आहे. उदयनराजेंची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीही नव्हती व नाही. तथापि, गोरगरीब जनतेविषयी त्यांना असलेला नितांत आदर, झटपट निर्णय आणि लोकांची कामे झाली पाहिजेत ही प्रामाणिक भावना, यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची सतत बहरत आहे.
या व्यक्तीला कुठेतरी अडवले पाहिजे या हेतूनेच मागे सुद्धा त्यांना २२ महिने कोणताही गुन्हा न करता अनाठायी त्रास सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा उभारी घेत प्रस्थापितांच्या अयोग्य बाबींवर प्रहार करत खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेकांचा विरोध-रोष पत्करून, सामान्य जनतेच्या हिताचीच भूमिका घेतली आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळेच उदयनराजेंना कसेही आवरा नाही तर आपला बोरी-बिस्तारा गुंडाळा या अनामिक भीतीने, पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले यांना अडकवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भ्रष्ट लोकप्रतिनिधींकडून खेळी खेळली जात आहे,’ म्हणूनच एकट्या उदयनराजेंच्या अटकेची त्यांनी केलेली मागणी, त्यांची पापी मनोवृत्ती दर्शवत आहे.
नुकत्याच जिल्ह्यातील व्यक्तींनी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली, त्याकामी संबंधित आरोप असणाऱ्या व्यक्तींना अटक करावी, सिंचन घोटाळ्यातील अधिकारी आणि जिल्ह्यातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी यांना अटक करावी, जनतेच्या मालकीच्या, सहकारी बँका आणि सहकारी कारखाने ज्यांनी बुडवली व ठेवीदारांना लुटले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी आदी मागण्या सुद्धा त्या-त्या वेळेस किंवा या निवेदनात केली असती तर त्यांना संविधानाचा निश्चितपणे आदर आहे, हे दिसले असते. परंतु त्यांनी केले नाही.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच ते जिल्ह्यातील भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या हातातले बाहुले बनल्यानेच अशी व्यक्तीद्वेषांची मागणी करीत आहेत. तथापि, कितीही काही म्हटले तरी सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशीच आहे,’ असेही नानासाहेब भोसले यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)