पळशी ते पळशी फाटा रस्ता डांबरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:20+5:302021-04-17T04:38:20+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी ते पळशी फाटा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता ...
पळशी : माण तालुक्यातील पळशी ते पळशी फाटा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी ठेकेदाराने संपूर्णपणे उखडून टाकला आहे. या मार्गावर अद्यापही डांबर तर पडले नाहीच; पण पळशी ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारक यांना या रस्त्यावरून खडी तुडवत उडणाऱ्या धुरळ्यातून जीव मुठीत धरून वाहने चालवून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. रस्ता अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर शासनाने कडक कारवाई करून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पळशी ग्रामस्थांनी दिला आहे.
हा रस्ता सातारा-पंढरपूर या राज्यमार्गाला मिळत असून, या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपूर्वी रस्ता उखडून त्यावर मुरूमीकरण करून त्यावर खडीकरण करण्यात आले. मात्र, यावरच रस्त्याचे काम बंद पडले. रस्त्यावर टाकलेली खडी पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली असून, ठिकठिकाणी उखडली आहे. या उखडलेल्या खडीवरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कधी-कधी उखडलेल्या खडीच्या रस्त्यावरून अनेक वाहने घसरून छोटे-मोठे अपघात घडले आहेत. तसेच उडणाऱ्या धुरळ्यामुळे अनेकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पळशी ते पळशी फाटा या मार्गाची दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताला निमंत्रण नको, या कारणाने अनेकांनी दहिवडीला येण्यासाठीचा मार्ग बदलला आहे. सध्या अनेकजण मनकर्णवाडी मार्गे लोधवडे फाट्यावरून जातात, तर काही जण गावातून म्हसोबा मंदिर मार्गे माने वस्ती ते धामणी फाटा या पर्यायी रस्त्याचा वापर प्रामुख्याने करताना दिसत आहेत. मार्ग बदलताना वाहनांना डिझेल, पेट्रोल अधिकतम जाळावे लागत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला जादा चाट बसत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
१६पळशी
फोटो:
पळशी ते पळशी फाट्यापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.