माठांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:37+5:302021-03-16T04:38:37+5:30

सातारा : सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. त्यामुळे सातारकरांमधून माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी होत ...

Demand for butter | माठांना मागणी

माठांना मागणी

Next

सातारा : सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. त्यामुळे सातारकरांमधून माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. काहीजण साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातून माठ खरेदी करत आहेत. त्यामुळे कारागीरांनाही चांगल्याप्रकारे रोजगार मिळत आहे.

०००००

रस्त्याचे पॅचवर्क

सातारा : साताऱ्यातील मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. या उखडलेल्या रस्त्यावर पालिकेच्यावतीने रविवारी पॅचवर्क करण्यात आले. मात्र रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे.

००००००

सातारकरांची रेल्वे वाहतुकीकडे पाठ

सातारा : कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अनेक जिल्ह्यातून येत असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असल्याने सातारकरांनी रेल्वेचा वापर करण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेकजण पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटीचा वापर करण्यावर भर देत आहेत.

०००००००

टोप्यांना मागणी

वडूज : दुष्काळी खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून दुपारी शेतात जाणे अवघड होत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांमधून टोप्या, गाॅगलला मागणी वाढत आहे. आकर्षक रंग, आकारातील टोप्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. त्यांना मागणी वाढत आहे.

०००००००

पार्किंगची गैरसोय

सातारा : साताऱ्यातील प्रांताधिकारी, तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी नागरिक येत असतात. मात्र या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना आवाराच्या बाहेर वाहने लावावी लागतात. पण वाहने तेथून उचलून नेली जातात. त्यामुळे नागरिकांतून असंतोष व्यक्त होत आहे.

०००००

एटीएममधून खराब नोटा

सातारा : साताऱ्यातील अनेक एटीएम सेंटरमधून खराब नोटा बाहेर येत आहेत. पाचशे, दोन हजाराच्या खराब नोटा बाजारात स्वीकारल्या जात नाहीत. मात्र एटीएममधून शाई लागलेल्या किंवा त्यावर काही तरी लिहिलेल्या नोटा येत आहेत. अशा नोटा वापरताना नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.

००००००

चौकोन गायब

सातारा : लाॅकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दुकानदारांकडून चांगली काळजी घेतली जात होती. दारात रंगाचे चौकोन तयार केले होते. त्यामध्ये उभे राहूनच ग्राहकही खरेदी करत होते. पण कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली अन् नागरिकांची भीती मोडली आहे. आता तर असे चौकोनही गायब झाले आहेत.

००००००००

महामार्गावर अडथळे

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेच्या गावांतील नागरिकांनी, जनावरांनी महामार्गावर येऊ नयेत म्हणून संरक्षक जाळ्यांपासून अडथळे तयार केले होते. मात्र महामार्गाकडेच्या काही हाॅटेल व्यावसायिकांनी स्वत: होऊनच ग्राहकांना दुकानात येता यावे यासाठी या जाळ्या तोडल्या आहेत. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळे तयार झाले आहेत.

०००००

बांधकामातील महिलांचे दु:ख जाणले

परळी : सातारा येथील मुक्तायन फाैंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम मजूर महिलांसोबत संवाद साधून त्यांचे दु:ख जाणून घेतले. त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली. यावेळी मुक्तायन फाैंडेशनच्या अध्यक्षा रूपाली भोसले, मेघा कांबळे, अमित काळे, रोहित भोसले, सचिव रवी कांबळे, स्नेहा भोसले, शशिकांत गंगावणे उपस्थित होते.

००००००

एकेरीतूनच वाहतूक

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमधून कोणत्याही दिशेने जाण्यासाठी एकेरीच वाहतूक आहे. बसस्थानक ते कोल्हापूर मार्गाला दुहेरी वाहतूक चालते, मात्र लेन स्वतंत्र आहेत. तरीही अनेक सातारकर नियम तोडून एकेरीमधून चुकीच्या दिशेने वाहतूक करत असतात. हे इतरांसाठी धोकादायक ठरू शकते.

००००००

लिफ्ट धोकादायक

सातारा : साताऱ्यातील अनेक सदनिकांमध्ये असलेल्या लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर काम सुरू असल्याने दरवाजेच नाहीत. तेथेच कामगारांची लहान मुलेही येत असतात. अशा ठिकाणच्या लिफ्ट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र ठेकेदार लक्ष देत नाहीत.

Web Title: Demand for butter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.