दिवाळीनंतर सभांचा बार; पंतप्रधान, विरोधी पक्षनेते येणार !; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सभांचीही मागणी
By नितीन काळेल | Published: October 30, 2024 07:37 PM2024-10-30T19:37:40+5:302024-10-30T19:39:49+5:30
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतरच नेत्यांच्या सभांचा बार उडणार आहे. यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या ...
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतरच नेत्यांच्या सभांचा बार उडणार आहे. यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभाचे नियोजन सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी नेत्यांच्या सभेची मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरुन झाले आहेत. आता ४ नोव्हेंबरला अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच प्रचाराला वेग येणार आहे. त्यातच सध्या दिवाळी असल्याने शांत वातावरण आहे. त्यामुळे ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीतूनही नियोजन सुरू झालेले आहे. सातारा जिल्ह्यातही आघाडी आणि युतीतच प्रामुख्याने लढती होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू झालेले आहे. तसेच काही पक्षांनी वरिष्ठांकडे सभांचीही मागणी केलेली आहे.
महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांची मागणी होत आहे. पण, राज्यात वरिष्ठ नेत्यांच्या सभांची कोठे आवश्यकता आहे, त्यानुसार या सभा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातही सभा घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही सभा होणार आहेत.
महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होईल. तसेच जिल्ह्यात उध्दवसेनेचे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचीही सभा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.