वसना उपसा सिंचन योजनेत वंचित गावांचा समावेश करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:23+5:302021-01-04T04:32:23+5:30
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरलेल्या वसना उपसा सिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या गावांचा या योजनेत ...
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरलेल्या वसना उपसा सिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हा कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन केली.
उत्तर कोरेगावमधील शेती क्षेत्रासाठी वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी वसना उपसा सिंचन योजना तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली आहे. या उपसा सिंचनामुळे या भागातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या योजनेच्या पूर्वानियोजित आराखड्यामध्ये बऱ्याच गावांचा समावेश न झाल्यामुळे उत्तर कोरेगावमधील बहुतांशी गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी या ठिकाणी वसना उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण होऊन त्या गावातील लोकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.