आदर्की पोलीस चौकीला स्वतंत्र दर्जाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:28+5:302021-05-25T04:43:28+5:30
आदर्की : फलटण पश्चिम भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संस्थानात ब्रिटिश राजवटीतील व देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आदर्की येथे पोलीस ...
आदर्की : फलटण पश्चिम भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संस्थानात ब्रिटिश राजवटीतील व
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आदर्की येथे पोलीस चौकी आहे. आता वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, वाढती कारखानदारीचा विचार करून आदर्की पोलीस चौकीला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी होत आहे.
फलटण संस्थान काळात आदर्की खुर्द येथे तपासणी नाका होता. त्याच ठिकाणी ब्रिटिशकालीन पोलीस चौकीची इमारत होऊन तेथे ब्रिटिश पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी कामकाज पाहत असत. त्यानंतर देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर लोणंद पोलीस स्टेशन अंतर्गत आदर्की बुद्रुक येथे दूरक्षेत्र पोलीस चौकीची स्थापना करून फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, बिबी, कोराळे, घाडगेवाडी, सासवड, टाकोबाईचीवडी, हिंगणगाव, शेरेचीवाडी (हिंगणगाव) सालपे, मुळीकवाडी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम दोन कर्मचारी संस्थानकालीन इमारतीमधून पाहत होते.
चाळीस वर्षांपूर्वी आदर्की बुद्रुक येथे पोलीस चौकी व पोलीस वसाहतीची इमारत बांधण्यात आली व तेथून
कामकाज सुरू झाले.
चौकट..
सापले घाटात लूटमारी, अपघातांत वाढ..
आदर्की दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या हद्दीत सालपे व हणमंतवाडी घाट, मिरगाव खिंड, नानाघोल येथे लूटमारी, वाटमारी वांरवार होत असते, तर अपघातही या ठिकाणी होत असतात.
त्याप्रमाणे एक साखर कारखाना, डिस्टिलरी, चार दूध डेअऱ्या, त्याबरोबर छोटे दहा-बारा लघुउद्योग आहेत.
वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, अपघात समोर ठेवून आदर्की पोलीस चौकीला स्वतंत्र पोलीस चौकीचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.