उंबरी-धावली रस्ता खचल्याने ठेकेदाराच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:21+5:302021-07-30T04:40:21+5:30
सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने ...
सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याला चरे पडले असून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी उंबरी ग्रामस्थांनी पाचगणी पोलीस ठाण्यात केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील उंबरी हे डोंगरकुशीत वसलेले गाव आहे. या गावाला जाण्यासाठी डोंगरातून एकच रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले होते परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे. यादरम्यान संबंधित ठेकेदाराने मोठ्या अवजड साहित्याची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात आला. वास्तविक हा रस्ता अवजड वाहतुकीस योग्य नव्हता. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उताराच्या बाजूस खचला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पूर्ण नादुरुस्त झाला आहे. डोंगरातून आलेले पाणी रस्त्यावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा.
निवेदनावर विनोद उंबरकर, रुपेश उंबरकर, बाबाजी उंबरकर, संतोष उंबरकर, संजय उंबरकर, आनंदा उंबरकर, विशाल दिसते यांच्या सह्या आहेत.
फोटो
उंबरी- धावली रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.