कृषी विभागाचे खरीप नियोजन; साताऱ्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळी सावट
By नितीन काळेल | Published: April 24, 2024 06:59 PM2024-04-24T18:59:01+5:302024-04-24T18:59:25+5:30
शुक्रवारी खरीपची जिल्हा बैठक: खते अन् बियाणे मुबलक; कमतरता भासणार नाही
सातारा : पावसाळा तोंडावर आला असून कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी सुमारे ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच खताचेही १ लाख ९ हजार टन आवंटन मंजूर आहे. त्यातील ६३ हजार मेट्रीक टन खत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास ‘कृषी’ला आहे. या पार्श्वभूमीवर २६ रोजी खरीप बैठक होत असलीतरी शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरीपसाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलीतरी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच काही प्रमाणात खते आणि बियाणेही शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर दि. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची खरीप हंगाम आढावा बैठक होत आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने शेतकऱ्यांना खते आणि बियाणे आवश्यक असतात. पाऊस वेळेत सुरू झाला तर पेरणीही उरकते. पण, गेल्यावर्षी कमी पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरीपावर दुष्काळाचे सावट असलेतरी कृषी विभागासह शेतकरीही तयारी आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे.
यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणं अपेक्षित आहे. तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यात सुमारे १ हजार ७०० क्विंटल बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे लवकर पेरणी सुरू केलीतरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. पिकांसाठी खतांची आवश्यकता राहते. यासाठी शासनाने खरीप हंगामाकरीता १ लाख ९ हजार ५०० मेट्रीक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. सध्या ६३ हजार ९१८ मेट्रीक टन खतसाठा शिल्लक आहे. तसेच मागणीप्रमाणे पुरवठाही होणार आहे. त्यामुळे खताची टंचाईही भासणार नाही, अशी स्थिती आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू असलीतरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन केलेले आहे. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, भात बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी सुरू करण्यात येणार आहे. आता २६ एप्रिल रोजी खरीपची बैठक होत असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पालकमंत्री घेत बैठक..
जिल्ह्याची खरीप हंगामाची बैठक हे पालकमंत्री घेत असत. साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात ही बैठक होत असते. पण, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता आहे. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ही बैठक होत आहे.
१२ भारारी पथके करणार कारवाई..
दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.
जिल्ह्यात जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे. यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. दि. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांची कमतरता भासणार नाही. सध्या काही साठाही शिल्लक आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी