शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी; गटशिक्षणाधिकारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:39+5:302021-06-28T04:26:39+5:30
सातारा : एका प्राथमिक शिक्षिकेला त्रास देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सातारा तालुका पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्यावर ...
सातारा : एका प्राथमिक शिक्षिकेला त्रास देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सातारा तालुका पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, 'आपल्या दोघात झालेला प्रकार जर कोणाला सांगितलास तर तुझे शैक्षणिक कामकाज खराब करुन तुमची नोकरी घालवतो,' अशी धमकी दिली असल्याचेही संबंधित शिक्षिकेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत एक ४० वर्षीय महिला शिक्षिका कार्यरत आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याने दि. ५ ऑक्टोबर २०१८ ते दि. १७ जून २०२० पर्यंत या कालावधीत त्रास दिला. पीडित प्राथमिक शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, धुमाळ याने शिक्षिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून कामावर असताना त्रास दिला. यानंतर त्यांच्याकडे एकटक पाहत तुम्हाला तुमच्या घरी माझ्या गाडीतून सोडतो, असे सांगितले. तुला माझा आधार होईल, तुला इथून पुढे शाळेत कसलाही त्रास होणार नाही. तुझ्याविषयीच्या सर्व तक्रारी मी निकालात काढीन. या तक्रारी तू मला मिळावीस म्हणून मी मुद्दाम केल्या होत्या, असेही धुमाळ याने त्या शिक्षिकेला सांगितले. असे बोलत असतानाच धुमाळ याने त्या शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, त्याला नकार देण्यात आल्यानंतर तू मला नकार देऊ नकोस, असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
आपल्या दोघात झालेला प्रकार जर कोणाला सांगितलास तर तुझे शैक्षणिक कामकाज खराब करून तुमची नोकरी घालवतो, अशी धमकीही त्याने दिली. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात शनिवार, दि. २६ रोजी रात्री उशिरा तक्रार दिल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत धुमाळ याला अटक करण्यात आली नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी हे याबाबत अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, रविवारी दुपारी गटशिक्षणाधिकारी धुमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याने प्रकृतीचे कारण पोलिसांना सांगितल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.