रिफ्लेक्टरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:48+5:302021-03-13T05:10:48+5:30

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर ...

Demand for reflectors | रिफ्लेक्टरची मागणी

रिफ्लेक्टरची मागणी

Next

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते आनेवाडी टोलनाका या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे. महामार्ग प्राधिकरणने धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

कठड्यांची दुरवस्था

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादूपर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहे. मुसळधार पावसामुळे या घाटात अनेकदा दरडी कोसळल्या असून, संरक्षक कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटक व वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसत आहे. बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

सातारा : शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. कोटेश्वर मंदिर ते मोळाचा ओढा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना नेमका कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न पडत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ

सातारा : शासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानुसार सातारा पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली. विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांसह तत्सम वस्तू जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. ही मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शहरातील छोट्या-मोट्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जलवाहिनीला गळती

सातारा : सदर बजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र, मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे या योजनेला खो बसत आहे. विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकला जात असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याने ढीग साचले असून, याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Demand for reflectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.