शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी
By admin | Published: April 26, 2017 01:15 PM2017-04-26T13:15:53+5:302017-04-26T13:15:53+5:30
राष्ट्रवादी युवक काँगेसतर्फे वडूज येथे नायब तहसीलदारांना निवेदन
आॅनलाईन लोकमत
वडूज (जि. सातारा), दि. २६ : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमधून भीषण दुष्काळ असून, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांना सकंटातून सावरावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने वडूज येथे नायब तहसीलदार सुधाकर दाहिंजे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार भाव नाही. शेती व्यवसाय करत असताना सावकारी व बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत आजअखेर मिळाली नाही. गेल्या वर्षभरात अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली आहे. या शेतकरी बांधवांचे संसार देशोधडीला लागले आहेत. बळीराजा पूर्णपणे अडचणीत असून, सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी. अन्यथा यापुढे प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत, वडूजचे माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत खुडे, नितीन शिंदे, अविनाश शिंदे, प्रा. तुषार सावंत, नामदेव सावंत, तानाजी हराळे, नीलेश पाटोळे, सचिन खाडे, दत्तात्रय फाळके, गणेश सानप, अश्विन मदने, संदीप फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)