अजिंक्यतारा ऱस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:17+5:302021-01-13T05:43:17+5:30
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. ...
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाकडून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, अर्धा रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागाने उर्वरित कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या खणआळी व जुना मोटर स्टॅंड परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. याठिकाणी वाहने लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक वाहने रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पिकांना फटका
आदर्की : फलटण पश्चिम भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाला मोठा फटका बसला. ज्वारी पिकाला यंदा चांगली कणसे आली होती. मात्र, सलग तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पथदिवे बंद
सातारा : चारभिंती परिसरातील पथदिवे बंद असल्याने हा परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी शाहूनगर व परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पहाटे व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे; त्यामुळे येथील पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
माॅर्निंगवॉकला गर्दी
सातारा : सलग तीन ते चार दिवस निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर थंडीची तीव्रता ओसरू लागली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. शहरातील अजिंक्यतारा किल्ला, मंगळाई देवी मंदिर, चार भिंती, कुरणेश्वर, यवतेश्वर या ठिकाणी नागरिक मॉर्निंगवॉकला येत आहेत.