कोसळत्या पावसात धनगर समाज रस्त्यावर आरक्षणाची मागणी : अनुसूचित जमातीनुसार सवलती देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:19 PM2018-08-24T21:19:08+5:302018-08-24T21:24:30+5:30
धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सातारा : धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोसळत्या पावसातही धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी भिजत रस्त्यावर बसून राहिले.
‘एक धनगर, कोट धनगर’च्या गगनभेदी घोषणा देत धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षणासंदर्भात सरकारवर हल्लाबोल करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. येथील सैनिक स्कूल मैदानापासून सुमारास धनगर समाजबांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये पारंपरिक वेशात धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. याप्रसंगी समाजबांधवांच्या वतीने मनोगतेही व्यक्त करण्यात आली.
धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करताना केला. या राज्यकर्त्यांवर आता विश्वास राहिला नाही, अशी भावना धनगर समाजबांधवांमधून व्यक्त होत होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार, उठ धनगरा जागा हो.. आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे, एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नायं.. घेतल्याशिवाय राहत नाही,’ अशा गगनभेदी घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता. कपाळी भंडारा आणि हातात झेंडे घेतलेल्या महिला व युवकांची मोर्चात लक्षणीय गर्दी होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर समाजबांधव येऊन थांबले. ‘ना नेता, ना पक्ष आता धनगर दक्ष’, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांच्या कपाळावर पिवळा भंडारा लावलेला होता, अनेकजण खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन आले होते. या आंदोलनामुळे सातारा कोरेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. यावेळी सात मुलींनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बारामतीमध्ये मोर्चा काढला तेव्हा ‘आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. धनगर समाजाच्या जीवावर जशी सत्ता मिळविता येते, हे राज्यकर्त्यांना माहीत आहे; पण तशाच पद्धतीने आम्ही ती ओढून घ्यायला कमी पडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. राजू गोरे, माजी नगरसेवक अशोक शेडगे, हणमंत चवरे, जगन्नाथ जानकर आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?
राज्यकर्त्यांनी गेल्या ७० वर्षांच्या काळात धनगर समाजाची फसवणूकच केली. अनेकदा आश्वासने देण्यात आली; पण ती पाळली नाहीत. त्यामुळे खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?, असा उद्विग्न सवालही यावेळी विचारण्यात आला.
तंटा समितीचं काही देणं-घेणं नाही
राज्य शासनाने तंटा समिती नेमल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या समितीशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. समाजाच्या हक्काचं आरक्षण सर्वांना मान्य अहे. ते शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
धनगर या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र ‘धनगड’ या शब्दामुळे या संपूर्ण समाजाची फसवणूक करण्यात आली. आदिवासी लोकांचे २५ आमदार निवडून येतात, आम्हाला तेच आरक्षण दिलं असतं तर आमचेही लोक संसदेत गेले असते. या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तत्काळ जाहीर करावं, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- टी. आर. गारळे, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी