कऱ्हाडला वाढीव भागात फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:02+5:302021-03-26T04:40:02+5:30
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत ...
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागातील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
देसाई कारखान्याची आज ऑनलाइन वार्षिक सभा
पाटण : दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, २६ सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दौलतनगर येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी मंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई व सर्व संचालक मंडळ सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. कारखान्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लिंकद्वारे व ज्या सभासदांनी त्यांचे मोबाइल नंबर कारखान्याकडे नोंद केले असतील त्यांना मोबाइलवर पाठविलेल्या लिंकद्वारे या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केले आहे.
वरद चव्हाण याचा कऱ्हाडात सत्कार
कऱ्हाड : दि अल्टिमेट नॉलेज यांच्यावतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल अॅप्टिट्युड टेस्ट या परीक्षेत विरवडे, ता. कऱ्हाड येथील एंजल्स इंटरनॅशनल स्कूलचा सहावीमधील विद्यार्थी वरद सुरेश चव्हाण याने पूर्व परीक्षेत प्रथम क्रमांक व मुख्य परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यास प्रमाणपत्र व कांस्य पदक देण्यात आले. कऱ्हाड जनता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, विश्वस्त ऋतुजा पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
अण्णासाहेब पाटील यांना मंद्रुळकोळेत अभिवादन
ढेबेवाडी : माथाडी कामगारांचे नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त मंद्रुळकोळे, ता. पाटण या त्यांच्या जन्मगावी अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय पाटील, अण्णासाहेब काळे, शिवाजी पाटील, श्रीकांत पाटील, नितीन चव्हाण, दिलीप पाटील, प्रताप मुळीक, सुजाता कारंडे, मेघाली शिंदे, रूपाली पाटील, मनिषा पाटील, वंदना मुळीक, सविता शिंदे, सुनीता पुजारी आदींसह ग्रामस्थांनी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आभिवादन केले.
वक्तृत्वमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
चाफळ : माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त सत्यजितसिंह पाटणकर युवा मंचच्यावतीने आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत समर्थ रणजित माने व सानिका संभाजी बाबर हिने तृतीय क्रमांक मिळविला. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.