एसटीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:25+5:302021-02-16T04:39:25+5:30
पुलाजवळ खड्डे कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाड ...
पुलाजवळ खड्डे
कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाड शहरातून बाहेर पडण्यासाठी दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्यात खड्डे असल्याने चालकांना कसरत करीत दुचाकी चालवाव्या लागत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
उपमार्गावर पार्किंग
कऱ्हाड : उपमार्गावर पार्किंगला मनाई असली तरी सर्रास बेशिस्तपणे पार्किंग केले जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होत आहे. मलकापूरपर्यंत ठिकठिकाणी वाहने रस्त्यातच उभी केलेली असतात. पोलिसांनी उपमार्गावरील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
धोकादायक वृक्ष
कऱ्हाड : घारेवाडी ते तांबवे या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. माल वाहतूक वाहनांचीही ये-जा असते. मोठ्या वाहनांच्या काचांना वृक्षांच्या फांद्या थटून काचा फुटत आहेत. या धोकादायक फांद्या, तसेच वृक्ष हटविण्याची मागणी होत आहे.
वानरांकडून नुकसान (फोटो : १५इन्फो०१)
तांबवे : सुपने परिसरात हंगामातील पिकांचे वानरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. तसेच गावठाणातही वानरांच्या टोळीने शिरकाव केला असून, त्यांच्याकडून घरांच्या छतांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आली आहेत. त्यातच वानरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.