वाल्मिक पठारावर एसटी सेवेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:01+5:302021-01-21T04:35:01+5:30
निवेदनात म्हटले आहे की, वाल्मीक पठारावरील असवलेवाडी, काटकरवाडी, भिलारवाडी, डावरी, कंकवस्ती, जंगमवाडी, कळकेवाडी, धडामवाडी यासह सुमारे पंधरा वाड्या-वस्त्या आहेत. ...
निवेदनात म्हटले आहे की, वाल्मीक पठारावरील असवलेवाडी, काटकरवाडी, भिलारवाडी, डावरी, कंकवस्ती, जंगमवाडी, कळकेवाडी, धडामवाडी यासह सुमारे पंधरा वाड्या-वस्त्या आहेत. या परिसरासाठी बाजारपेठेचे मुख्य ठिकाण ढेबेवाडी असून येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व शासकीय कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना नियमित प्रवास करावा लागतो. मात्र, प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मनमानी प्रवासभाडे आकारणीमुळे सुमारे पाच हजार ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
दुर्गम आणि डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या तसेच रस्त्यांची दुरवस्था, अनेक वस्त्यांना नसलेले रस्ते या अनेक कारणांनी या वाड्यांना एसटी सेवा मिळत नाही. अशा खडतर परिस्थितीत या डोंगर पठारावरील अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मात्र, अलीकडच्या काळात अगदी गावपोहोच पक्के रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे एसटी सेवा देणे सहजशक्य आहे. याबाबत वाल्मिक पठारावरील जनतेची होणारी गैरसोय विचारात घेऊन दिवसातून किमान तीनवेळा एसटी फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
फोटो : २०केआरडी०५
कॅप्शन : वाल्मिक पठारावर एसटी सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस किरण पाटील यांनी शरद पवार यांना दिले.