शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे; विद्युत पुरवठाही खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:04 PM2018-09-04T21:04:41+5:302018-09-04T21:06:24+5:30
घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी
शिरवळ : घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे ठोकले.
याबाबत माहिती अशी की, घाडगेवाडी पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, तेथे पहिली ते चौथीच्या वर्गात नऊ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. स्थापनेपासून दोन शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये एका शिक्षकाची नियमित बदली झाली आहे. तर एका शिक्षकाचे निधन झाले. त्यानंतर खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दररोज एका शाळेतील शिक्षक याठिकाणी पाठविले जातात, असा आरोप घाडगेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
घाडगेवाडी शाळेसाठी नियमित शिक्षकांची नेमणूक करावी, याबाबतची मागणी चार महिन्यांपासून ग्रामस्थ खंडाळा पंचायत समितीचे अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे करत आहेत. आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी अचानकपणे शाळेत येऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बाहेर काढून शाळेला टाळे ठोकले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी गजानन आडे, नायगाव केंद्रप्रमुख शाहजहानबी शेख यांना संतापलेल्या ग्रामस्थांनी घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. आडे, शेख यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खंडाळा गटशिक्षणाधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय व शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय कुलूप काढणार नसल्याचा पवित्रा घेतला.
तीन महिन्यांपासून वीज खंडित
घाडगेवाडी शाळेचे वीजबिल तीन महिन्यांपासून थकीत राहिल्याने वीज कंपनीने वीजही तोडली आहे. याठिकाणी दररोज येणाºया शिक्षकांबरोबर विद्याथ्यानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.