वारीच्या अखंड परंपरेची वारकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:26+5:302021-07-10T04:27:26+5:30
फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. ...
फलटण : वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन, प्रवचनांना परवानगी द्यावी आणि ह. भ. प. बंडा महाराज कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटण वारकरी संप्रदायाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.
वारकरी संप्रदाय मंडळ, फलटण तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी ह. भ. प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, गणपतराव बाबुराव निकम, नंदकुमार कुमठेकर महाराज, सत्त्यवान महाराज जाधव, विजय महाराज लावंड, दिगंबर गोरे, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, आदी वारकरी उपस्थित होते.
गतवर्षी सन २०२०मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते. मात्र, कोणीही वारकऱ्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती. परंतु, चालूवर्षी सन २०२१मध्ये शासन, प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवले, उपाययोजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षित होता पण तसे घडले नसल्याबद्दल या निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक सर्व नियम, निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने हे सर्व सोहळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणच्या वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्नही चर्चेने सहज सोडविता आले असते. पण तसे केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.